चोपडा (प्रतिनिधी) एका ६५ वर्षीय वृद्धाकडून एका पोलीस हेड कॉन्स्टेबलने दोन हजार आणि मोबाईल हिसकावल्याप्रकरणी चोपडा शहर पोलिसात जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चक्क पोलिसाविरुद्धच जबरीचा गुन्हा दाखल झाल्यामुळे खळबळ उडाली आहे. संतोष पारधी असे संशयित आरोपी पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे.
या संदर्भात अधिक असे की, दिनकर ओंकार ठाकरे (वय ६५, रा. पाटीलगढी) हे दि. १६ फेब्रुवारी रोजी शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकातील पेडकाई मोबाईल गॅलरी येथे लोकांची गर्दी दिसल्याने काय झाले बाबत चौकशी करण्यास गेले होते. त्याठिकाणी गर्दीतील लोक म्हणत होते की, पंचनामा झाला पोलीस लोक येऊन गेलेत. त्यावेळी दिनकर ठाकरे म्हणाले की, श्वान पथक चौकशीसाठी मागवायला हवे व चोरांचा कायमचा बंदोबस्त झाला पाहीजे. त्यावेळी पोलीस हेड कॉन्स्टेबल संतोष पारधी यांना राग आल्याने त्याने दिनकर ठाकरे यांना शिवीगाळ व दमदाटी करुन मोटर सायकलवर बसवून पोलीस स्थानकात आणत चापटा बुक्यांनी मारहाण केली. यामुळे श्री. ठाकरे यांच्या कानास दुखापत झाली. तसेच आपल्या खिशातील २ हजार रुपये व मोबाईल फोन काढून घेत तो नंतर परत केला. परंतू पैसे परत न केल्याचा आरोप देखील श्री. ठाकरे यांनी फिर्यादीत केला आहे. या प्रकरणी न्यायालयाच्या आदेशाने गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सपोनि संतोष चव्हाण हे करीत आहेत.