मुक्ताईनगर (प्रतिनिधी) प्रधानमंत्री किसान योजनेच्या एका लाभार्थी जिवंत शेतकऱ्याला मयत दाखवून त्याला लाभापासून वंचित ठेवण्याचा प्रकार मुक्ताईनगर तालुक्यातील थेरोळात समोर आला आहे.
यासंदर्भात अधिक असे की, थेरोळा ता. मुक्ताईनगर येथील शेतकरी रोहिदास मारोती बज्जर यांचे थेरोळा शिवारात शेत आहे. शेतकऱ्यांना आर्थिक मदत म्हणून केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री किसान योजनेचा लाभ घेण्यासाठी बज्जर यांनी रीतसर नोंदणी केली असून त्यांना दोन हप्ते मिळाले आहेत. मात्र काही काळानंतर त्यांना नियमित हप्ते येणे बंद झाले. आज ना उद्या आपले हप्ते येतील या आशेवर त्यांनी वाट पाहिली मात्र इतर शेतकऱ्यांना लाभ मिळत असताना त्यांना मात्र लाभ मिळतच नव्हता.
यामागचे कारण बज्जर यांनी शोधले असता त्यांचे पीएम किसानचे खाते निष्क्रिय असल्याचे समजले आणि त्यासाठी रोहिदास बज्जर हे चक्क मयत झालेले आहेत हे कारण दिलेले असल्याचे दिसून आले. जिवंत असूनही मयत दाखवून आपणास लाभापासून वंचित ठेवले जात असल्याचा आरोप त्यांनी केला असून मुक्ताईनगर तहसील कार्यालयातील गलथान कारभारावर बोट ठेवले आहे.