तुळजापूर (वृत्तसंस्था) तालुक्यातील सांगवी मारडी येथे पाच वर्षीय मुलाचा खून झाल्याची घटना उघडकीस आली आहे. दरम्यान, एका अल्पवयीन मुलाने खून केल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे. पोलीसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवण्यास सुरुवात केली आहे.
पोलीसांनी सांगितले की, मृत मुलाचे नाव ओम मनोज बागल (वय ५) असे आहे. ओम मनोज बागल याचे वडील मनोज बागल हे शेती आणि ड्रायव्हिंग करतात. गुरूवारी ता.१६ मनोज बागल हे दुपारी एक वाजण्याच्या सुमारास घराकडे आले. त्यावेळी ओम याने वडिलांना चाॅकलेट साठी पैसे मागितले. मनोज बागल यांनी ओम यांस दहा रूपये दिले. ओम चाॅकलेट आणण्यासाठी गेला तो परत आलाच नाही. ओम याचे वडील गावातील दुकानदार जरासंध बागल यांच्याकडे आमचा मुलगा ओम दुकानात चाॅकलेट घेण्यासाठी आला होता का याची विचारपूस केली. त्यावेळी दुकानदार जरासंध बागल यांनी ओम हा चाॅकलेट घेऊन परत गेला असे सांगितले.
ओम याचा मृतदेह शेजारच्याच घरात
मनोज बागल आणि त्यांच्या नातेवाईकांनी ओम याची शोधाशोध केली. ओम सापडला नसल्याने तुळजापूर पोलीसांत मनोज बागल यांनी अज्ञात लोकाविरूद्ध अपहरणाची फिर्याद शुक्रवारी ता.१७ मध्यरात्री एक वाजण्याच्या सुमारास दाखल केली. यासंदर्भात तुळजापूर पोलीसांनी शुक्रवारी सकाळपासूनच तपासाची चक्रे फिरवली. गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक गजानन घाटगे, पोलीस निरीक्षक आजिनाथ काशीद यांच्यासह पथकाने तपास केल्यानंतर सदर ओम याचा मृतदेह शेजारच्याच घरात असल्याचे लक्षात आले.
नायलाॅनच्या दोरीने गळा आवळला
ओम यांस चापट मारून नायलाॅनच्या दोरीने गळा आवळला असे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे. यासंदर्भात पोलीसांनी उपविभागीय पोलीस अधिकारी डाॅ. सई भोरे पाटील यासह पोलीसांनी संशयित तपासाची चक्रे फिरवण्यास सुरुवात केली आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक निवा जैन यांच्या मार्गदर्शनाखाली तपास गतीने चालू आहे.