जळगाव (प्रतिनिधी) ट्र्क मालक विश्वास संपादन करुन त्याच्या मालकीचे दोन ट्रक परस्पर विकून दुसऱ्याच्या नावे करणाऱ्या आरटीओ एजंटसह एकाविरुद्ध रामानंद नगर पोलिस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ब्रिजेशकुमार प्रकाश यादव ( रा. स्वामीनारायण नगर सावदा – रावेर) आणि शहादत अली यासीन अली (आरटीओ एजंट रा. फैजपूर ता. यावल) अशी गुन्हा दाखल झालेल्या दोघं संशयित आरोपींची नावे आहेत.
देविदास सिताराम राठोड (रा. लक्ष्मीनारायण नगर सावदा ता. रावेर) असे फसवणूक झालेल्या तरुणाचे नाव आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, १९ फेब्रुवारी रोजी ब्रिजेशकुमार यादव आणि शहादत अली यांनी संगनमत करून देविदास राठोड यांचा विश्वास संपादन करत त्यांच्या दोन्ही ट्रकांची परस्पर विक्री करून त्या दुसऱ्याच्या नावावर केल्या. एवढेच नव्हे तर देविदास राठोड यांना ट्रक विक्रीची कोणतीही रक्कम दिली नाही. शेवटी फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर राठोड यांनी रामानंद पोलिसात फिर्याद दिली. त्यानुसार दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलिस निरीक्षक शिल्पा पाटील ह्या करत आहेत.