पाचोरा (प्रतिनिधी) भर चौकात गोळीबार करून वाळू व्यावसायिकाची हत्या करण्यात आली. आकाश मोरे असे हत्या झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. गोळीबारीच्या या घटनेमुळे पाचोरा परिसरात भीतीचे वातावरण असून पोलिस पुढील तपास करत आहेत.
पाचोरा शहराच्या गजबजलेल्या बस स्थानक परिसरात भरदिवसा सिनेस्टाईल थरार घडला. मोटारसायकलवर आलेल्या दोघा अज्ञात मारेकऱ्यांनी २६ वर्षीय तरुणावर गावठी कट्ट्याने तब्बल १२ गोळ्या झाडून निर्घृण हत्या केली. वाळू व्यवसायाशी संबंधित असलेल्या या तरुणाचा मृत्यू जागीच झाला. गोळ्यांचा मारा इतका भीषण होता की त्याचे शरीर अक्षरशः चाळण झाले. गोळीबारानंतर परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून मारेकरी घटनास्थळावरून पळ काढण्यात यशस्वी झाले आहेत.
दरम्यान, मृत आकाश मोरेने (वय २६, रा. छत्रपती शिवाजी नगर, पाचोरा) दोन दिवसांपूर्वीच आपल्या सोशल मीडियावर एक खळबळजनक स्टेटस ठेवले होते. त्यात लिहिले होते — “शेठ, तुम्ही हवेत गोळ्या मारता… आम्ही थेट छातीवर मारतो, रोक आणि ठोक!” या स्टेटसचीच जणू पुनरावृत्ती करत मारेकऱ्यांनी देखील थेट समोरून येत त्याच्यावर ठो… ठो… करत गोळ्यांचा वर्षाव केला. या घटनेला वाळू व्यवसायातून निर्माण झालेल्या जुन्या वादाचं स्वरूप असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
मृत्यूच्या भीतीने शरण आले!
आकाश मोरेची निर्घृण हत्या करून पसार झालेल्या दोघा मारेकऱ्यांनी अखेर स्वतःहून पोलिसांसमोर शरणागती पत्करली. शुक्रवारी रात्री सुमारे पावणे अकराच्या सुमारास हे दोघे जामनेर पोलीस ठाण्यात आले. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, दोघांनाही त्यांच्या मागावर काहीजण असल्याची भनक लागली होती. जीवावर बेतण्याची भीती वाटल्यामुळे ते म्हसावद-नेरी मार्गे जामनेरला पोहोचले.
जळगावकडे पलायन करत असतानाच, भीतीच्या छायेत सापडलेल्या दोघांनी थेट पोलिस ठाण्याच्या दारात येऊन, “पोलिस स्टेशन कुठे आहे?” अशी विचारणा केली. त्यांच्यापैकी एकाची ओळख नीलेश अनिल सोनवणे अशी असून दुसरा मारेकरी अल्पवयीन आहे. पोलिसांनी दोघांना ताब्यात घेत पुढील चौकशी सुरू केली आहे.