जळगाव (प्रतिनिधी) जळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत महाविकास आघाडी प्रणीत पॅनलला बहुमत मिळाले आहे. त्यामुळे सर्वसंमतीने सभापती आणि उपसभापती निवड होईल, असे वाटत होते, मात्र घडले भलतेच. नाट्यमय घडामोडीनंतर श्यामकांत सोनवणेंनी मारली बाजी. श्यामकांत सोनवणे व लक्ष्मण पाटील यांच्यात मतदान होवून श्यामकांत सोनवणे हे अठरा पैकी पंधरा मते घेवून विजयी झाले. परंतू तत्पूर्वी आज सभापतीपदासाठी ‘मविआ’मध्ये जोरदार राडा बघावयास मिळाला.
कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत महाविकास आघाडीच्या ११ जागा विजयी झालेल्या आहेत. स्पष्ट बहुमत असूनही महाविकास आघाडीतच सभापती पदावरुन वाद निर्माण झाले. लक्ष्मण पाटील यांनी सुरुवाती पासूनच सभापतीपदासाठी दावा केला होता. परंतू त्याचवेळी श्यामकांत सोनवणे यांनी देखील या पदावर दावा केला आणि ‘मविआ’मध्ये मोठे मतभेत बघायला मिळाले. आज शेवटच्या क्षणापर्यंत सोनवणे व पाटील या दोघांपैकी माघार घ्यायला कुणीही तयार नव्हते. त्यामुळे वादाला तोंड फुटले. परंतू हात उंचावून घेण्यात आलेल्या मतदानात सोनवणे यांना लक्ष्मण पाटील, त्यांचा मुलगा संदीप पाटील व हेमलता नारखेडे वगळता उर्वरित सर्व १५ संचालकांनी मतदान केले. दरम्यान, निवड जाहीर झाल्यानंतर माजी पालकमंत्री गुलाबराव देवकर यांनी नवनिर्वाचित सभापती व उपसभापतींचे स्वागत केले.