चाळीसगाव (प्रतिनिधी) कुठलीही पूर्वसूचना न देता आज अचानकपणे झालेल्या रास्ता रोको आंदोलनामुळे सकाळपासून आलेल्या चाळीसगाव येथे शाळा कॉलेज साठी आलेल्या बऱ्याच विद्यार्थी- विद्यार्थिनी या दुपारी ३ वाजेपर्यंत चाळीसगाव बस स्थानकावर अडकून पडल्या होत्या, सकाळपासून पोटात अन्नाचा कण देखील नसल्याने तसेच येण्या जाण्यासाठी दुसरा पर्याय नसल्याने ते सर्व घाबरलेल्या अवस्थेत होते.
याबाबत आमदार मंगेशदादा चव्हाण यांच्या धर्मपत्नी व शिवनेरी फाउंडेशनच्या अध्यक्षा सौ.प्रतिभाताई चव्हाण यांना माहिती मिळताच त्यांनी तात्काळ आपल्या फाउंडेशनच्या सदस्यांसोबत चाळीसगाव बस स्थानक गाठत बस स्थानकावर उपस्थित महिला वर्ग, विद्यार्थी विद्यार्थिनींची विचारपूस केली. यावेळी घाबरलेल्या एका विद्यार्थिनीने प्रतिभाताई समोर अक्षरशा रडून देत आपली भावना मोकळी केली. “ताई, सकाळपासून अन्नाचा कण देखील नाही, पाऊस सुरू आहे कुटुंबाशी संपर्क होऊ शकत नाही, दुसरा पर्यायी मार्ग नाही यामुळे आम्ही काय करावे सुचत नव्हते, केव्हा घरी जाऊ असं झालं आहे” असं सांगितले.
यावेळी प्रतिभाताई चव्हाण यांनी त्या विद्यार्थिनीला सावरत “घाबरू नको दीदी तुमनी बहीण तुम्हना सोबत शे, काळजी करू नको” असा संवाद साधत त्यांना धीर दिला व तात्काळ चिवडा फरसाण पॅकेट्स आणत तेथे अडकलेल्या विद्यार्थिनींना वाटप केली. तसेच चाळीसगाव बस स्थानकाचे आगार प्रमुख मयूर पाटील यांची भेट घेऊन त्यांना जादा बसेसची व्यवस्था करण्याची विनंती केली तसेच ज्या गावाला बस सोडण्यास काही अडचण असेल त्या गावांना शिवनेरी फाउंडेशनच्या माध्यमातून खाजगी वाहनाने सदर विद्यार्थ्यांना त्यांच्या गावात सोडण्यात येईल याबाबत नियोजन करण्याचे सांगितले.
यादरम्यान रहीपुरी वडगाव लांबे येथील विद्यार्थ्यांनी आमदार मंगेशदादा चव्हाण यांचे कार्यालय गाठत प्रतिभाताई यांची भेट घेतली, त्यांना कार्यालयात चहा बिस्किटे व फरसाण देण्यात आले व कार्यालयाच्या खाजगी वाहनांनी सदर विद्यार्थी विद्यार्थिनींना सुखरूप पणे आपल्या गावी सोडण्यात आले.
संवेदनशीलतेचे चाळीसगाव वासीयांना घडले दर्शन !
नार पार प्रकल्पाच्या नावाने गेल्या काही तासांपासून सुरू असलेले जलसमाधी आंदोलनाकडे लोकांचे लक्ष वेधण्यासाठी प्रशासनाला कुठल्याही प्रकारची पूर्व सूचना न देता अचानकपणे रास्ता रोकोच्या स्वरूपात आंदोलन करण्यात आले. त्यामुळे चाळीसगाव धुळे महामार्गावरील गिरणा नदीच्या पुलाच्या आजूबाजूला अनेक किलोमीटर वाहनांच्या रांगा लागल्या. यात मोठे नुकसान चाळीसगाव तालुक्यातील शाळेत येणाऱ्या जाणाऱ्या हजारो विद्यार्थी विद्यार्थिनी झाले व ते बसस्थानकावर अडकून पडले. एकीकडे बदलापूर घटनेमुळे राज्यात महिला विद्यार्थिनी सुरक्षिततेचा मुद्दा गाजत असताना दुसरीकडे मात्र याच विद्यार्थिनींना सहा-सात तास रस्ता अडकवून ठेवण्याचे पाप एका माजी लोकप्रतिनिधी यांच्याकडून करण्यात आले मात्र दुसरीकडे प्रसंगावधान ओळखत शिवनेरी फाउंडेशनतर्फे या सर्व अडकलेल्या विद्यार्थ्यांना मदत करण्यात आली. संवेदनशीलपणे परिस्थिती हाताळणारे लोकप्रतिनिधी व त्यांच्या सौभाग्यवती तर दुसरीकडे आंदोलनाच्या नावाखाली जनतेला वेठीस धरणारे राजकारणी, अश्या या दोन्ही घटनांची बस स्थानकात चर्चा होती.