मुंबई (वृत्तसंस्था) क्रूझ ड्रग्ज प्रकरणातील आरोपी आर्यन खानच्या सुटकेसाठी मध्यस्था मार्फत २५ कोटींची मागणी झाल्याचा आरोप पंच प्रभाकर साईल यांनी केला आहे. यावर आता अल्पसंख्यांक मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी या प्रकरणाची गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील आणि मुंबईच्या पोलीस आयुक्तांनी दखल घेत एसआयटी मार्फत चौकशी करावी अशी मागणी केली आहे.
समीर वानखेडे खोट्या केसेस बनवून लोकांना अडकवत आहेत. दहशत निर्माण करत आहेत. वसुली सुरू आहे हे मी आधीपासूनच सांगत आहे. आता त्यांचाच पंच समोर आला असून त्यानेच गौप्यस्फोट केले आहेत. याबाबत पोलीस आयुक्त आणि गृहमंत्र्यांशी बोलणार. या शहरात ऑर्गनाईज क्राईम सुरू आहे. या लोकांनी हजारो कोटी रुपये वसूल केले आहेत. कुठे तरी या घटनेची दखल घेऊन त्याची एसआयटी मार्फत चौकशी केली पाहिजे. याबाबत मी मागणी करणार आहे. उद्या रात्री मुंबईत आल्यानंतर गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील आणि पोलीस आयुक्तांना भेटून ही मागणी करणार आहे, असं मलिक यांनी सांगितलं.
प्रभाकर साईल याचा व्हिडीओ हे एक षडयंत्रं असल्याचा दावा भाजपने केला आहे. त्यावरही त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. त्यांना काहीही बोलू द्या. साईल स्वत:च सांगतो तो गोस्वीचा बॉडीगार्ड आहे. मी गोसावी आणि भानुशालीचा व्हिडीओ काढल्यानंतर एनसीबीचे ज्ञानेश्वर सिंग यांनी पीसी घेतली होती. त्यावेळी त्यांनी नऊ लोकांची नावे घेतली होती. त्यातील हा पहिल्या नंबरचा पंच आहे. पंच यांनीच आणले. पंच यांनीच ठरवले. तो गोसावीचा बॉडी गार्ड आहे. त्याने गौप्यस्फोट केल्यानंतर हे षडयंत्रं सांगत आहेत. आमचं म्हणणं आहे चौकशी होऊ द्या. त्यात सर्व बाहेर येईल. हेच नाही इतर लोकांकडूनही यांनी पैसे घेतले आहेत. तेही हळूहळू बाहेर येतील. बोलू शकतील, असं त्यांनी सांगितलं.