जळगाव (प्रतिनिधी) तक्रार आपल्या स्तरावरून निकाली काढल्यानंतरही संबंधित शाळेवर पुढील कार्यवाही करण्याचा प्रस्ताव शिक्षण उपसंचालक कार्यालयाकडे पाठविल्याबाबत आपण पालकांना सांगून, पालकांची दिशाभूल करताय. सदर बाब गंभीर आहे, अशा शब्दात शिक्षण उपसंचालकांनी शिक्षणाधिकारींवर ताशेरे ओढले आहेत. परंतू दुसरीकडे शिक्षण उपसंचालक नितीन उपासनी यांचा शानबाग विद्यालयाने सत्कार केला होता. म्हणून ते कारवाई करत नसल्याचा गंभीर आरोप, तक्रारदार रवींद्र शिंदे यांनी केला आहे.
शिक्षण उपसंचालक नितीन उपासनी यांनी शिक्षण अधिकारी (माध्यमिक) बी.जे.पाटील यांना पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे की, उपरोक्त विषयी संदर्भीय पत्रानुसार आपणाकडून कै. श्रीमती ब.गो. शानभाग विद्यालय, सावखेडा, ता.जळगाव या शाळेतील विद्यार्थ्यांचा निकाल फी साठी राखून ठेवण्याबाबत गट शिक्षणाधिकारी, पंचायत समिती, जळगाव यांच्या शिफारशीचा चौकशी अहवाल या कार्यालयास सादर केलेला आहे. सदर अहवालानुसार शालेय प्रशासन दोषी असल्याचे नमूद करून, संबंधित शाळेत भविष्यात अशी बाब घडणार नाही, असे आपण नमूद केलेले आहे. याचाच अर्थ सदरची तक्रार आपल्या स्तरावरून निकाली काढल्याचे निदर्शनास येत आहे.
मात्र, तरीही सदर शाळेवर पुढील कार्यवाही करण्याचा प्रस्ताव शिक्षण उपसंचालक कार्यालयाकडे पाठविल्याबाबत आपण पालकांना सांगून, पालकांची दिशाभूल करीत असल्याचे लक्षात आले असून, सदर बाब गंभीर आहे. यावरून, आपल्या प्रशासकीय नियत्रंणात कमतरता असल्याचे दिसून येते. सदर शाळेवर कारवाई करावयाची असल्यास, आर.टी.ई. तरतुदीनुसार सदर शाळेचा प्रस्ताव आपल्या स्वयंस्पष्ट शिफारशीसह सादर करावा. यापुढे अनावश्यक बाबींबाबतचा व आपल्या अधिकार क्षेत्रात कारवाई करण्याच्या बाबींचा प्रस्ताव या कार्यालयास सादर होणार नाही याची दक्षता घेवून, नोंद व्हावी, असे म्हटले आहे.
तर दुसरीकडे शिक्षण उपसंचालक नितीन उपासनी यांचा शानबाग विद्यालयाने सत्कार केला होता. उपासनी साहेबांवर सत्काराचा भार असल्यामुळेच ते कारवाई करत नसल्याचा गंभीर आरोप मुख्यतक्रारदार रवींद्र शिंदे यांनी केला आहे. एवढेच नव्हे तर, या सत्काराचा फोटोच त्यांनी पुरावा म्हणून दिला आहे. दरम्यान, याबाबत शिक्षण उपसंचालक व शिक्षण अधिकारी यांच्यासोबत संपर्क साधला असता होऊ शकला नाही.