मुंबई (वृत्तसंस्था) मी एचआयव्ही पॉझिटिव्ह होतो. त्यामुळे तिच्यासोबत कधीही शारीरिक संबंध ठेवले नाहीत. तसेच सरस्वती ही माझ्या मुलीसारखी होती. तिने आत्महत्या केली होती. तिचे हत्येचा आरोप आपल्यावर येईल, या भीतीने भीतीने मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी तुकडे केल्याचा खळबळजनक खुलासा आरोपी मनोज साने याने केला आहे. दरम्यान, सानेच्या या दाव्यांमुळे हत्याकांडाला नवीन कलाटणी मिळाली आहे.
मनोज साने याने आपल्याला श्रद्धा वालकर प्रकरणावरुन सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे करण्याची कल्पना सुचल्याचे पोलीस चौकशीत सांगितले. वसईच्या श्रद्धा वालकर हिची तिचा लिव्ह इन पार्टनर आफताब पुनावाला याने अशाचप्रकारे हत्या केली होती. आफताबने श्रद्धाच्या मृतदेहाचे ३५ तुकडे करुन त्यांची विल्हेवाट लावली होती. आफताबने श्रद्धाच्या मृतदेहाचे तुकडे करुन ते फ्रीजमध्ये ठेवले होते. तसेच मृतदेहाची दुर्गंधी लपवण्यासाठी रुम फ्रेशनर्स, अत्तरांचा वापर केला होता.
मनोज साने यानेदेखील सरस्वती वैद्य हिची हत्या केल्यानंतर निलगिरी तेलाच्या पाच बाटल्या खरेदी केल्या होत्या. मृतदेह लवकर कुजू नये,यासाठी मनोजने त्यावर निलगिरी तेल लावले होते. आफताब पुनावालाही श्रद्धाचे मुंडके आणि मृतदेहाचे इतर तुकडे अनेक दिवस घरात ठेऊन सहजपणे वावरत होता. त्याप्रमाणे मनोज साने यानेही किचन आणि बेडरुममध्ये सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे ठेवले होते आणि दुसऱ्या बेडरुममध्ये तो रोज झोपत होता.
तसेच प्राथमिक चौकशीदरम्यान साने यांनी पोलिसांना सांगितले की, 2008 मध्ये तो एचआयव्ही पॉझिटिव्ह असल्याचे त्याला समजले. तेव्हापासून तो औषधोपचारावर असल्याचेही सांगीतले. पोलिसांसमोर दिलेल्या कबुलीजबाबनुसार, लिव्ह-इन पार्टनर असलेली सरस्वती ही स्वभावाने खूपच संशयखोर होती आणि तिला संशय होता की मनोज जेव्हाही उशिरा घरी परततो तेव्हा तो कोणासोबत तरी असतो. दरम्यान, सरस्वती ही माझ्या मुलीसारखी होती, असेही सानेने म्हटले आहे. आरोपी मनोज सानेने या प्रकरणी केलेले दावे ऐकून पोलीस देखील चक्रावले आहेत.
मीरा रोडच्या गीतानगरमध्ये राहणाऱ्या 56 वर्षांच्या मनोज सानेने त्याची लिव्ह इन पार्टनर 32 वर्षीय सरस्वती वैद्यची निर्घृण हत्या केली. हत्येनंतर आरोपीने सरस्वतीच्या मृतदेहाचे इलेक्ट्रिक ट्री कटरच्या सहाय्याने बारीक बारीक तुकडे केले होते. त्यानंतर आरोपीने हे तुकडे प्रेशर कुकरमध्ये टाकून शिजवले आणि कुत्र्यांना खायला घातले. तर काही तुकडे त्याने मिक्सरच्या भांड्यात टाकून बारीक केले होते.
सरस्वती ही अनाथ होती. तर मनोज साने हा बोरीवलीत शिधावाटप केंद्र चालवत होता. २०१४ साली सरस्वती वैद्यशी मनोजची ओळख झाली. या ओळखीचं प्रेमात रुपांतर झाल्यानंतर मागील आठ वर्षापासून दोघे मीरा रोड येथे राहत होते. तर, खून झाला त्या घरात गेली तीन वर्षापासून पती-पत्नी प्रमाणे राहत असल्याचेही समोर आले आहे.