बीड (वृत्तसंस्था) जर अभिनेता शाहरूख खान याने भाजपमध्ये प्रवेश केला तर भाजपवाले शाहरूखच्या मुलाकडे कोकेन नव्हे तर पिठी साखर सापडली म्हणून सांगतील, असा सणसणीत टोला अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी लगावला. ते बीडमध्ये बोलत होते.
छगन भुजबळ पहिल्यांदाच बीडमध्ये आले होते. सध्या कोणावरही धाडी सुरू आहेत. शाहरुख खान उद्या भाजपमध्ये गेल्यानंतर इथे कोकेन नाही तर पिठी साखर सापडली असे म्हणतील, अशी टीका भुजबळांनी भाजपवर केली. तसेच सध्या संपूर्ण बॉलिवूड आणि महाराष्ट्राला बदनाम करण्याचे काम सुरू आहे, असंही ते म्हणाले.
यावेळी त्यांनी महाराष्ट्र सदन घोटाळ्याप्रकरणी तुरुंगात राहावं लागलेल्या दिवसांच्या आठवणींना उजळा दिला. आमच्या घरावर १७ वेळी धाडी पडल्या. धाडी पडल्या की आमच्या पत्नी, मुले घाबरून मॉलमध्ये जाऊन बसायचे. तो काळ विचित्र होता. दिवसभर मॉलमध्ये राहायचं आणि रात्री घरी जायचे, असं त्यांनी सांगितलं. अजित पवारांच्या बहिणीच्या घरीही धाडी घातल्या. आठ आठ दिवस अधिकारी घरात शिरून बसले होते, असंही त्यांनी सांगितलं.
ओबीसी समाजाचे राजकीय आरक्षण रद्द झाले हे आरक्षण पूर्ववत करण्यासाठी आम्ही प्रत्येक पातळ्यांवर लढत आहोत. विरोधक मात्र विरोधाला विरोध करायचा म्हणून आंदोलने उभी करत आहेत. मात्र त्यांच्या आंदोलनाचे देखील आम्ही स्वागत करतो. मात्र ओबीसी आरक्षणासाठी इथे जन जागरण करण्यापेक्षा ओबीसी समाजाला घटनात्मक आरक्षण मिळावे यासाठी दिल्ली सरकार समोर जागरण घाला, असं आवाहन भुजबळ यांनी केलं.