मुंबई (वृत्तसंस्था) संजय राऊत यांनी आता बंडखोर आमदारांना 24 तासात परत येण्याचं आवाहन केलं आहे. तुम्ही परत या. सरकारमधून बाहेर पडण्याबाबत विचार होईल. तुमचं म्हणणं ऐकून घेऊ. तुमच्या भूमिकेवर विचार करू, असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.
‘वर्षा’ निवासस्थानात आज शिवसेना नेते आणि आमदारांची बैठक आयोजित केली होती. त्यावेळी झालेल्या पत्रकार परिषदेत संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी शिवसेनेचे आमदार कैलाश पाटील आणि नितीन देशमुख यांनी एकनाथ शिंदे यांनी सूरतमधून कशी सुटका केली, याबाबत अनुभव मांडले. त्यांच्या वक्तव्यानंतर शिवसेना नेते संजय राऊत यांनी म्हटले की, बाहेर असलेल्या शिवसेना आमदारांना जर आपण महाविकास आघाडीतून बाहेर पडावे आणि वेगळा विचार करावा असे वाटत असेल तर तोदेखील विचार करू. मात्र, तुम्ही आधी 24 तासात मुंबईत येण्याची हिंमत दाखवावी. मुंबईत आल्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासोबत प्रत्यक्ष चर्चा करावी असे आवाहन राऊत यांनी यावेळी केले.
शिवसेना नेते संजय राऊत यांनी म्हटले की, पत्रकारांना व इतरांना व्हॉट्सअॅपवर हॉटेलमधील फोटो, व्हिडिओ पाठवण्यापेक्षा प्रत्यक्षात येऊन चर्चा करावी. आमचा गुवाहाटीमधील 21 आमदारांसोबत संपर्क झाला असल्याची माहिती यावेळी राऊत यांनी दिली. राऊत यांनी म्हटले की, राज्याबाहेर गेलेले शिवसेनेचे 20-25 आमदार पुन्हा शिवसेनेत येतील असा विश्वास आहे. महाविकास आघाडीतून बाहेर पडावं अशी इच्छा असेल तर तुम्ही प्रत्यक्षात भेटून चर्चा करावी. मात्र, त्यांचा हा बहाणा असल्याचे राऊत यांनी म्हटले. सरकारमधून बाहेर पडावे असं त्यांना वाटत असते तर त्यांनी प्रत्यक्षात चर्चा केली असती, असेही राऊत यांनी म्हटले. संजय राऊत यांनी सरकारमधून बाहेर पडण्याबाबत विचार करू असे म्हटल्यानंतर राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे.