नवी दिल्ली (वृत्तसंस्था) केंद्र सरकारने १ मे पासून १८ वर्षांपुढील सर्वांना लसीकरणाची परवानगी दिली आहे. मात्र कोणतंही राज्य १८ ते ४४ वयोगटाच्या लसीकरणासाठी अद्याप तयार नसल्याचा दावा काँग्रसचे ज्येष्ठ नेते पी चिदंबरम यांनी केला आहे. “जर लस नाही म्हणून १ मे नंतर लसीकरण केंद्रांवरुन लोकांना घरी पाठवण्यात आलं तर आरोग्यमंत्री राजीनामा देणार का?,” अशी विचारणा करत चिदंबरम यांनी जाहीर आव्हान दिलं आहे.
एकीकडे मोठ्या प्रमाणात लसीकरण करण्यासाठी केंद्र सरकार आवाहन करत असताना दुसरीकडे अनेक राज्यांनी लसींचा तुटवडा असल्याची तक्रार केली आहे. ठाकरे सरकारनेही राज्यात १ मे पासून लसीकरण सुरु होणार नसल्याचं स्पष्ट केलं आहे. यादरम्यान काँग्रसचे ज्येष्ठ नेते पी चिदंबरम यांनी केंद्रीय आरोग्यमंत्री हर्ष वर्धन यांना आव्हान दिलं आहे. १ मे रोजी केंद्रीय आरोग्यमंत्री हर्ष वर्धन यांची कसोटी असणार असल्याचं पी चिदंबरम यांनी म्हटलं आहे. पी चिदंबरम यांनी ट्विट करत म्हटलं आहे की, “आरोग्यमंत्री हर्ष वर्धन यांची १ मे रोजी कसोटी असेल. राज्यांकडे लसींचा मुबलक साठा असल्याचा त्यांचा आणि त्यांच्या सरकारचा दावा हवेत उडून जाईल”.
चिदंबरम यांनी यावेळी कोणतंही राज्य १८ ते ४४ वयोगटाच्या लसीकरणासाठी अद्याप तयार नसल्याचा दावा केला. इतकंच नाही तर CoWin अॅपही सहकार्य करत नाही असंही ते म्हणाले आहेत. “जर लस नाही म्हणून १ मे नंतर लसीकरण केंद्रांवरुन लोकांना घरी पाठवण्यात आलं तर आरोग्यमंत्री राजीनामा देणार का?,” अशी विचारणा करत चिदंबरम यांनी जाहीर आव्हान दिलं आहे.