मुंबई (वृत्तसंस्था) ईडीच्या नावानं धमक्या देऊन किरीट सोमय्यांनी (Kirit Somaiya) शेकडो कोटी रुपये गोळा केले, असा आरोप शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केला. ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते. सोमय्यांनी ईडीच्या नावानं धमक्या दिल्यात. सोमय्या पिता-पुत्र नक्कीच जेलमध्ये जाणार, असा इशारा राऊत यांनी दिला आहे.
संजय राऊत म्हणाले, मुंबईतील बिल्डर मुंबईतील व्यापारी यांच्याकडून ईडीच्या नावाने धमक्या देऊन या किरीट सोमय्याने आतापर्यंत शेकडो कोटी जमा केले आहेत. ८ jvpd स्कीम, सुजीत नवाब नावाचा एक प्लॉट आहे. तो प्लॉट किरीट सोमय्या आणि त्याचा मित्र अमित देसाई बिल्डर या दोघांनी मुळ मालकाला ईडीची धमकी देऊन १०० कोटी रुपयांचा प्लॉट त्याहूनही अधिक जास्त किमतीचा प्लॉट मातीमोल भावाने अमित देसाईंच्या नावाने करून घेतला.
१५ कोटी ईडीच्या अधिकाऱ्याला दिले
ईडीची धमकी देऊन हा प्लॉट आपल्या नावे करून घेतला आहे आणि त्यातले पंधरा कोटी रुपये किरीट सोमय्या यांनी कोणत्या ईडी अधिकाऱ्याला नेऊन दिले हे स्पष्ट करावं ईडीने… नाहीतर मी त्या अधिकाऱ्याचं नाव घेईल असंही संजय राऊत म्हणाले.
बाप बेटे जेलमध्ये जाणार
मी तुम्हाला काय सांगितलं भाजप पक्षाचे साडेतीन नेते जेलमध्ये जाणार, तुमची अपेक्षा होती की मी ती नावे काल सांगेल, जसे जसे ते आतमध्ये जातील तसे तसे तुम्ही मोजत जा. बाप बेटे नक्की जेलमध्ये जाणार, बाप बेटे १००% जेलमध्ये जात आहेत. दुसऱ्याला जेलमध्ये घालवायचे धमक्या देतात आता तुम्ही जा असंही संजय राऊत म्हणाले.