मुंबई (वृत्तसंस्था) विधीमंडळ अर्थसंकल्पी अधिवेशन सुरु आहे. या अधिवेशनात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजपने उपस्थित केलेल्या प्रश्नांवर खोचक शैलीमध्ये उत्तरे दिली आहेत. रावणाचा जीव जसा बेंबीत होता तर काहींचा जीव मुंबईत अडकला आहे. असा घणाघातही मुख्यमंत्र्यांनी केला आहे.
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांनाही त्यांनी उत्तरे दिली आहेत. त्यांनी राज्यपालांच्या अभिभाषणावेळी झालेल्या गोंधळाबाबत आपली मते मांडली आहेत. यावेळी बोलताना त्यांनी म्हटलंय की, आपण किमान राज्यपालांना बोलू द्यायला हवं होतं. त्यांना राष्ट्रगीताला तरी थांबू द्यायला हवं होतं. मात्र, काल देवेंद्र फडणवीसांनी ज्याप्रमाणे विंदा करंदीकरांची ‘तेच ते तेच ते’ कविता ऐकवली, त्याचप्रमाणे ‘दाऊद एके दाऊद’ करुन त्यांचे आमदारही वागताना दिसले.
विंदांच्या कवितेप्रमाणे देवेंद्रजी तुम्हीही तेच करत राहिला
पुढे मुख्यमंत्री म्हणाले की, मला खोटं बोलता येत नाही. राज्यातले विरोधक केवळ तक्रारी करण्यासाठी हक्काने राज्यपालांकडे जातो आहे. किमान राज्यपाल काय म्हणतायत, ते तरी आपण ऐकून घ्यायला हवं होतं. काल देवेंद्र फडणवीस यांनी विंदा करंदीकर यांची ‘तेच तेच आणि तेच तेच’ कविता ऐकवलीत तशीच तुम्ही ‘दाऊद एके दाऊद’ करुन दाखवलं. मात्र, तुम्ही राज्यपालांचं भाषण ऐकायला हवं होतं. त्यांना राष्ट्रगीतांला तरी थांबू द्यायला हवं होतं. विंदांच्या कवितेप्रमाणे देवेंद्रजी तुम्हीही तेच ते करत राहिला, असंही मुख्यमंत्री म्हणाले.
मग समाजसुधारकांचं अनुकरण कसं करणार?
मुख्यमंत्री म्हणाले की, विरोधक तक्रारी करायला राज्यपालांना फक्त भेटतात. राज्यपालांचं भाषण ऐकलं नाही, मग समाजसुधारकांचं अनुकरण कसं करणार? अनेक योजना ते सांगणार होते, मात्र, ते ऐकूच दिलं नाही, असंही मुख्यमंत्री म्हणाले. आम्ही सर्वांच्या सूचनांची नोंद घेतो आणि त्यानुसार कारवाई करतो. मी आज तळमळीने बोलणार आहे. कारण मला खोट बोलता येत नाही. राज्यपालांच्या अभिभाषणाचं मला दुःख आहे. राज्यपाल एक संवैधानिक पद आहे. आपण अधिकार मानतो. आपण प्रथा-पंरपरा पाळल्या पाहिजे. एखाद्या गोष्टीबद्दल आक्षेप घ्यायचा आहे घेऊ शकता. पण, राज्याची संस्कृती आहे प्रथा आहे. राज्यपालांच्या अभिभाषणावेळी झालेला गोंधळ अशोभनीय होता.
रावणाचा जीव जसा बेंबीत होता तसा काहींचा जीव मुंबईत
पुढे मुख्यमंत्र्यांनी सुधीर मुनगंटीवारांना उद्देशून म्हटलं की, तुम्ही काल राज्याला मद्यराष्ट्र म्हणालात. मात्र, मी तुम्हाला मध्य प्रदेशचं उदाहारण देऊन सांगतो. देशात सर्वांत कमी दारुची दुकाने महाराष्ट्रात आहेत. मध्य प्रदेश, तमिळनाडू, उत्तर प्रदेशमध्ये सर्वाधिक दुकाने आहेत. आपल्या राज्याची बदनामी योग्य नाहीये. राज्यपालांनी सांगितलेला विकासही तुम्ही लोकांसमोर येऊ देत नाहीये. रावणाचा जीव जसा बेंबीत होता तसा काहींचा जीव मुंबईत आहे. देशात सत्ता असली तरी काहींचा जीव मुंबईत गुंतलाय. माझ्या मुंबईत जे काही करणार ते जगातला सर्वोत्तम असलंच पाहिजे, असा माझा कटाक्ष असतो. 8 भाषातून शिक्षण देणारी जगातील पहिली महापालिका मुंबईची आहे. घनकचरा व्यवस्थापन, झोपडपट्ट्यात मोठ्या प्रमाणावर शौचालये बांधली आहेत.
















