जळगाव (प्रतिनिधी) सार्वजनिक वितरण व्यवस्थेंतर्गत राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेतील शिधापत्रिकेतील सर्व लाभार्थ्यांचा मोबाईल क्रमांक व आधार क्रमांकाचे सीडिंग १०० टक्के पूर्ण करण्याच्या सूचना केंद्र सरकरारकडून प्राप्त झाल्या आहेत. शिधापत्रिकेतील ज्या लाभार्थ्यांचे आधार सीडिंग आणि मोबाईल सिडींग अद्याप झालेले नाही अशा लाभार्थ्यांना सदर कार्यवाही करता यावी यासाठी शासनाने ३१ जानेवारी,२०२१ पर्यंत विशेष मोहिम आयोजित करण्यात आली आहे, अशी माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी सुनील सूर्यवंशी यांनी दिली आहे.
जळगाव जिल्ह्यात या अनुषंगाने तालुक्यातील पुरवठा अधिकारी, कर्मचारी यांचे प्रशिक्षण संपन्न झाले. या पुढील टप्प्यात तालुका पुरवठा अधिकारी यांचयामार्फत रास्त भाव दुकानदारांचे प्रशिक्षण घेण्यात येत आहे. ज्या लाभार्थ्यांचे आधार आणि मोबाईल क्रमांक अद्याप सीड झालेले नाहीत, अशा लाभार्थ्यांचे मोबाईल व आधार क्रमांकाचे सिडींगची कार्यवाही रास्त भाव दुकानदार करणार आहेत. सदर कार्यवाही दि. १ जानेवारी पासुन सुरू होत आहे.
आधार सीडिंग : जळगाव जिल्ह्यात अंत्योदय आणि प्राधान्य कुटूंब योजनेच्या एकूण ६,०९,९२२ शिधापत्रिका असून यापैकी १२,७६० शिधापत्रिकांमध्ये एकाही लाभार्थ्याचा आधार क्रमांक सीड झालेला नाही. तसेच जिल्ह्यातील ६,०९,९२२ शिधापत्रिकेत एकूण २८,११,२५२ लाभार्थी असुन त्यापैकी २३,६८,०७६ लाभार्थ्यांचे आधार सीड असुन ४,४३,१७६ लाभार्थ्याचे आधार क्रमांक सीड झालेले नाहीत.
मोबाईल सीडिंग: जळगाव जिल्ह्यात अंत्योदय आणि प्राधान्य कुटूंब योजनेच्या एकूण ६,०९,९२२ शिधापत्रिका असून यापैकी ३,९२,५९३ शिधापत्रिकांमध्ये एकाही लाभार्थ्याचा मोबाईल क्रमांक सीड झालेला नाही. तसेच जिल्ह्यातील ६,०९,९२२ शिधापत्रिकेत एकूण २८,११,२५२ लाभार्थी असुन त्यापैकी ६,०२,०८१ लाभार्थ्यांचे मोबाईल सीड असुन २२,०९,१७१ लाभार्थ्याचे मोबाईल क्रमांक सीडींग झालेले नाही.
१ जानेवारी पासुन जळगाव जिल्ह्यातील सर्व रास्त भाव दुकानात त्या दुकानाशी संलग्न असलेल्या ज्या लाभार्थ्यांचे आधार आणि मोबाईल क्रमांक सीड झालेले नाहीत, अशा लाभार्थ्यांची यादी उपलब्ध करून देणेत येत आहे. रास्त भाव दुकानाशी संलग्न लाभार्थ्यांनी दुकानास भेट देऊन सदर यादी तपासून घ्यावी. त्यांचे आधार किंवा मोबाईल सिडींग झाले आहे किंवा नाही हे तपासून घेण्याची जबाबदारी संबंधित लाभार्थ्यांची आहे. या यादीत ज्या लाभार्थ्यांचे आधार / मोबाईल क्रमांक सीड झालेले नाहीत, अशा लाभार्थ्यांनी संबंधित दुकानदारांकडे असलेल्या ई-पॅास मशिनद्वारे त्यांचे आधार आणि मोबाईल क्रमांक सीड करून घ्यायचे आहेत. सदर प्रक्रीया अत्यंत सोपी असून त्वरीत पूर्ण होणारी आहे.
शासनाच्या २२ डिसेंबर, 2020 च्या सूचनापत्रानुसार सदर कार्यवाही ३१ जानेवारी, २०२१ पर्यंत पूर्ण करावयाची आहे. दि. ३१ जानेवारी पावेतो आधार सिडींग न झालेल्या लाभार्थ्यांचे देय धान्य जोपर्यंत आधार सिडींग होत नाही तोपर्यंत मिळणार नाही व यामुळे लाभार्थी अन्नधान्यापासुन वंचित राहिल्यास संबंधित लाभार्थ्यांची जबाबदारी रहाणार आहे.
जिल्ह्यातील ज्या लाभार्थ्यांचे आधार आणि मोबाईल अद्याप सीड झालेले नाहीत, अशा लाभार्थ्यांनी त्यांचे रास्त भाव दुकानात जाऊन यादी तपासुन घ्यावी आणि आधार आणि मोबाईल क्रमांकाचे सिडींग करून घ्यावे, असे आवाहन जिल्हा पुरवठा अधिकारी सूर्यवंशी यांनी केले आहे.