अहमदनगर (वृत्तसंस्था) नगर-कल्याण महामार्गावरील ढवळपुरी फाट्यावर बुधवारी पहाटे तीनच्या सुमारास एसटी बस, इको गाडी आणि ट्रॅक्टर या तीन वाहनांचा भीषण अपघात झाला. या अपघातात ६ जणांचा मृत्यू झाला तर तीन जण जखमी झाले आहेत. मृतांमध्ये दोघे पारनेर, तिघे संगमनेर तर एक जण पाथर्डी तालुक्यातील आहेत. अपघातग्रस्तांना मदत करताना तीन जण जखमी झाले आहेत.
अपघातात मृत्युमुखी पावलेल्यांमध्ये नीलेश रावसाहेब भोर (रा. देसवडे), प्रकाश रावसाहेब थोरात (रा. वारणवाडी, ता. पारनेर), अशोक चिमा केदार, जयवंत रामभाऊ पारधी, संतोष लक्ष्मण पारधी (रा. जांबूत, खुर्द, ता. संगमनेर) व सचिन कांतीलाल मंडलेचा (रा. टाकळी मानूर, ता. पाथर्डी) या सहा जणांचा समावेश आहे. भनगडेवाडी व ढवळपुरी परिसरातील दहा ते पंधरा तरुणांनी अपघातातील जखमींना मदत केली. अपघातात मदत करत एसटीचा पत्रा लागल्याने सुयोग अडसूळ, देवेंद्र गणपत वाडेकर व बद्रिनाथ विठ्ठल जगताप हे तिघेजण जखमी झाले आहेत. घटनेची माहिती मिळताच सहा. पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ यांच्यासह पारनेर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. या घटनेची फिर्याद देवेंद्र गणपत वाडेकर (रा. देसवडे, ता. पारनेर) यांनी दिली असून त्यांनी एसटी बसचालक संजय गोविंद नागरगोजे (रा. पाथर्डी) याच्या विरुद्ध हलगर्जीने बस चालवून अपघातास कारणीभूत ठरल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. एसटी महामंडळाची ठाणे-मेहकर एसटी बस, उसाचा ट्रॅक्टर आणि इको कार या तीन वाहनांचा अपघात झाला. वाहनांची धडक इतकी भीषण होती की, यामध्ये सहा जणांचा मृत्यू झाला.
मृतापैकी ५ जणांचा पारनेर ग्रामीण रुग्णालयात, तर एकाचा अहमदनगर येथे उपचार सुरू असताना मृत्यू झाला, अपघाताची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले व जखमींना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. अपघातामुळे महामार्गावर काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती. अपघातग्रस्त वाहने बाजूला करण्यात आली तद्नंतर वाहतूक सुरळीत झाली. एसटी बस ठाण्याहून नगरला येत असताना भनगडेवाडी शिवारात समोर उसाची ट्रॉली पलटी होऊन ऊस रस्त्यावर पडला होता, त्याला दुसरा ट्रॅक्टरचालक ट्रॅक्टर पुढे लावून त्यातील मजूर मदत करत होते, हे पाहून इको कारचालक थांबून पार्किंग लाईट लावून रोडवरील वाहनांना दिशा देत होता, त्यावेळी एसटी बस व ट्रॅक्टर ईको गाडीला धडकून अपघात झाल्याची प्राथमिक माहिती आहे.
















