भादली (प्रतिनिधी) भादली रेल्वेस्थानकापासून जवळच असणाऱ्या गेट नंबर १५३ भुयारी रेल्वे मार्ग काम सुरू करा, अशी मागणी शेतकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे एका निवेदनाद्वारे केली आहे. दरम्यान, १५ ऑक्टोबर पर्यंत काम सुरू न झाल्यास आंदोलनाचा इशाराही शेतकऱ्यांनी दिला आहे.
निवेदनात म्हटले आहे की, नशिराबाद येथील भादली रेल्वेस्थानकापासून जवळच असणाऱ्या गेट नंबर १५३ पाशी भुयारी रेल्वे मार्गाचे काम मंजूर झाले आहे. पण हे काम गेल्या तीन वर्षांपासून बंद आहे. गेट सुध्दा बंद आहे. परिणामी पलिकडे शेती असणाऱ्या शेतकऱ्यांना खूप अडचणींचा सामना करावा लागत आहे. आज अखेरपर्यंत हे गेट आणि ब्रीज निर्माण कार्य पूर्णतः बंद आहे. शेती कशी करायची हा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा ठाकला आहे. रेल्वे प्रशासनाने हे काम त्वरित सुरू करावे म्हणून शेतकऱ्यांनी अर्ज विनंत्या केल्या. मात्र रेल्वे प्रशासन कुंभकर्णी झोपेत आहे.
९ जुलै २०२१ रोजी शेतकऱ्यांनी एक निवेदन दिले होते. त्यानुसार २८, २९, ३० जुलै रोजी गांधीगिरी आंदोलनाचा इशारा दिला होता. पण भुसावळ विभागाचे मध्य रेल्वेचे बांधकाम अभियंता पंकज धाबारे यांनी सप्टेंबर अखेर काम सुरू करू, असे स्थानिक वृत्तपत्रातून प्रसिद्ध केले होते. त्यावर विश्वास ठेवून शेतकऱ्यांनी आंदोलन रद्द केले. पावसाळा संपत आला आहे. आतातरी हे अंडरपास ब्रिजचे काम लवकर सुरू करावे, असे यात म्हटले असून १५ ऑक्टोबर पर्यंत काम सुरू न झाल्यास आंदोलनाचा इशाराही शेतकऱ्यांनी दिला आहे.
निवेदनावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उपध्यक्ष पंकज महाजन, चंद्रकांत पाटील आणि सैयद बरकत यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.