जळगाव (प्रतिनिधी) सन २०२१-२२ या शैक्षणिक वर्षाकरिता प्राथमिक शिक्षण पदविका (D.EI.Ed) प्रथम वर्षाच्या शासकीय कोट्यातील ऑनलाईन प्रवेशाच्या एकूण तीन फेऱ्या घेण्यात आल्या आहेत. तथापि, अद्याप शासकीय कोट्यातील जागा रिक्त असल्याने त्या विशेष फेरीव्दारे ऑनलाईन पध्दतीने भरण्यात येणार आहेत.
प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य पध्दतीने प्रवेश होईल. यासाठी विद्यार्थी राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्या www.maa.ac.in संकेत स्थळावरुन ऑनलाईन अर्ज करु शकतात. याबाबत सविस्तर सूचना, प्रवेश नियमावली व अध्यापक विद्यालयनिहाय रिक्त जागा राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
प्रवेशाची शैक्षणिक पात्रता इयत्ता १२ वी उत्तीर्ण (खुला) संवर्ग ४९% व खुला संवर्ग वगळून इतर संवर्ग ४५ % गुणांसह), प्रवेश अर्ज ऑनलाईन भरण्याचा कालावधी दि. २४ ते २८ सप्टेंबर २०२१, पडताळणी अधिकाऱ्यांनी प्रमाणपत्रांची ऑनलाईन पाडताळणी करणे २४ ते ३० सप्टेंबर २०२१, प्रवेश अर्ज शुल्क (ऑनलाईन भरणे)–खुला संवर्ग रुपये २०० खुला संवर्ग वगळून इतर संवर्ग रुपये १०० इतके आहे.
यापूर्वी ज्यांनी अर्ज पूर्ण भरुन Approve करुन घेतला आहे. परंतू प्रवेश घेतलेला नाही असे विद्यार्थी प्रवेश घेऊ शकतात. ज्यांचा अर्ज अपूर्ण किंवा दुरुस्ती (Correction) मध्ये आहे. तसेच नव्याने प्रवेश अर्ज भरुन प्रवेश घेण्यास इच्छुक असलेले असे सर्व उमेदवार अर्ज भरु शकतात. अर्ज ऑनलाईन Approve केल्याशिवाय उमेदवाराचा प्रवेश प्रक्रियेत समावेश होणार नाही. या प्रक्रियेमध्ये विद्यार्थ्यांने स्वत:च्या लॉगीनमधूनच प्रवेश घ्यावयाचा आहे. विद्यार्थ्याने अध्यापक विद्यालयाची स्वत: निवड करुन लगेचच प्रवेशपत्र स्वत:च्या ईमेल लॉगीनमधून प्रिंट घ्यावयाची आहे व त्यानंतर अध्यापक विद्यालयात चार दिवसाच्या आत प्रत्यक्ष उपस्थित राहून प्रवेश घ्यावयाचा आहे.
प्रवेश प्रक्रियेच्या या विशेष फेरी नंतर (D.EI.Ed) प्रवेशासाठी कोणत्याही परिस्थितीत मुदतवाढ देण्यात येणार नाही याची नोंद घ्यावी, असे अध्यक्ष, राज्यस्तरीय डी.एल.एड प्रवेश निवड, निर्णय व संनियत्रण समिती, पुणे तथा संचालक, राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र राज्य, पुणे यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.