जळगाव (प्रतिनिधी) जळगाव जिल्हा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रदीप पवार यांनी विधवा महिलांबद्दल केलेले वक्तव्य निंदनीय असून त्यांच्या या वक्तव्याचा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सेक्रेटरी डी. जी. पाटील यांनी निषेध केला आहे. तसेच जिल्हाध्यक्षांनी महिलांची माफी मागावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे.
सध्या जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीचा प्रचार सुरू आहे. काँग्रेसचे जळगाव जिल्हाध्यक्ष प्रदीप पवार यांनी यावल येथील जिल्हा बँकेच्या प्रचार सभेत विधवा महिलांविषयी अनुद्गार काढले आहेत. ते निंदनीय असून या संदर्भात प्रदेश काँग्रेस कमिटीचे माजी सेक्रेटरी डी. जी. पाटील यांनी पत्रकान्वये निषेध व्यक्त केला आहे. प्रचारात आरोप-प्रत्यारोप करताना तोल जाऊ न देता व्यवस्थित बोलणे गरजेचे आहे. तर प्रदीप पवार यांनी महिलांची माफी मागावी, अशी मागणी देखील डी. जी. पाटील यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये केली आहे.
















