जळगाव (प्रतिनिधी) शहरातील शिवाजीनगर परिसरातील कानजी शिवजी या बंद पडलेल्या जिनिंगमध्ये लावलेल्या पाच ट्रकमधील बॅटऱ्या एका चोरट्याने लंपास केल्याप्रकरणी शहर पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या संदर्भात लक्ष्मण महादेव पोळ यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, शहरातील शिवाजीनगर भागातील कानजी शिवजी या बंद पडलेल्या जिनिंगमध्ये ते स्वतः तसेच हबीब पटेल, दिलीप चौधरी, सादिक मिया, स्वप्नील परदेशी असे सर्वजण घराजवळ जागा नसल्यामुळे त्यांच्या ट्रक तेथे लावत असतात. दि. २० नोव्हेंबर रोजी श्री.पोळ यांना त्यांच्या ट्रक ड्रायव्हर बाळू हुजदार याने फोन करुन कळविले की, आपल्या दोन ट्रकच्या बॅटरी बॉक्सचे कुलूप तूटलेली आहे. तसेच त्यातील बॅटरीच्या वायरिंग तुटलेला असून बॅटऱ्या चोरीला गेल्या आहेत. तसेच बाकीच्या इतर तीन ट्रकच्या सुद्धा अशाच प्रकारे बॅटऱ्या चोरीला गेल्याचे देखील त्यांनी सांगितले. त्यानुसार एम.एच. १९ झेड १७२२, एमएच १९ २०१७, हबीब पटेल यांच्या मालकीचा ट्रक एमएच २२, १७६४, दिलीप चौधरी यांचा ट्रक एमएच १९ झेड ६७१६ तसेच सादिक मिया यांचा ट्रक एमएच झिरो ०४ जीसी २५२३, एमएच-३० ४७१४ या सर्व ट्रकमधून बॅटरी चोरीला गेलेल्या होत्या. दरम्यान श्री.पोळ यांनी आपल्या फिर्यादीत संदीप डोके (रा.गेंदालाल मिल परिसर, पूर्ण नाव माहीत नाही) याच्यावर चोरीबाबत संशय व्यक्त केला आहे. दरम्यान या सर्व बॅटरींची किंमत अंदाजे ३० हजारापर्यंत असून याप्रकरणी शहर पोलिस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.