पुणे(वृत्तसंस्था) : अजित पवार यांच्या अनुपस्थितीबाबत अनेक चर्चा रंगल्या होत्या. शिर्डी येथील शिबिरात अजित पवारांची अनुपस्थिती म्हणजे दादा नाराज तर नाहीत ना, गुवाहटीच्या रस्त्यावर लक्ष ठेवून राहा रे कुछ तो गडबड है, असं ट्वीट मनसेचे प्रवक्ते गजानन काळे यांनी केलं होतं तर दुसरीकडे शिवसेनेच्या नीलम गोऱ्हे यांनी अजित पवार यांची गॅरंटी कोणीच घेऊ शकत नाही असं म्हटलं होते. गोऱ्हे यांच्या वक्तव्यावर राष्ट्रवादीच्या काही नेत्यांनी नाराजी व्यक्त केली होती.
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार हे पुन्हा एकदा सार्वजनिक जीवनात सक्रिय झाले आहेत. मागील काही दिवसांपासून विरोधी पक्षनेते अजित पवार सार्वजनिक कार्यक्रमात दिसत नसल्याने अनेक प्रश्न उपस्थित करण्यात येत होते. आज, या चर्चांना अजित पवार यांनी पूर्णविराम दिला. आपण परदेशात होतो अशी माहिती त्यांनी दिली. अजित पवार आज मावळच्या दौऱ्यावर आहेत.
जवळपास सात दिवसानंतर अजित पवार यांनी सार्वजनिक कार्यक्रमांना हजेरी लावण्यास सुरुवात केली आहे. पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी पाच दिवस कुठे होतो, याचा उलगडा केला आहे. अजित पवार यांनी म्हटले की, खोकला सुरू झाला होता, त्यानंतर परदेशात गेलो होतो. आता तब्येत बरी आहे. पण काहीही बातम्या सुरू झाल्या होत्या, असे म्हणत त्यांनी चर्चांना पूर्ण विराम लावला. मावळ येथील कार्यक्रमात बोलताना त्यांनी जाहीरपणे चर्चांना पूर्णविराम लावला. अजित पवार यांनी म्हटले की, गेली चार-पाच वर्षे मी परदेशात गेलो नव्हतो. त्यामुळे 4 नोव्हेंबर रोजी मी परदेशात गेलो आणि काल मध्यरात्री मी पोहचलो. थकलो होतो, पण आज ही इथं आलो नसतो तर आणखी वेगळ्याच बातम्या लागल्या असत्या. दादा इथं आले, दादा इथं नाही आले, दादा गायब झाले, दादा नाराज झाले. काहीही बातम्या सुरू होत्या. वारेमाप चर्चा करायची. दादा वाचून ह्यांचं काय नडते काय कळत नाही. दादाला काही खाजगी आयुष्य आहे की नाही? उगाच काहीही उठवून बदनामी करायची. असं म्हणत गायब असणाऱ्या आणि नाराजी मागचं गूढ अखेर स्वतःच समोर आणलं.