औरंगाबाद (वृत्तसंस्था) ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांच्या औरंगाबादच्या (Aurangabad) वैजापूरमधील सभेत चांगलाच राडा झाला. सभास्थळी दगडफेक झाल्यानंतर सभास्थळावरून निघत असताना काही तरुण त्याठिकाणी आले. त्यांनी वाहनं अडवण्याचा प्रयत्न केला. त्यावरून पोलीस आणि संतप्त तरुण यांच्यात चांगलीच झटापट झाली. पोलिसांनी या तरुणांना रोखलं आणि त्यानंतर आदित्य ठाकरे तिथून रवाना झाले.
आदित्य ठाकरे यांच्या औरंगाबादमधल्या शिवसंवाद यात्रेदरम्यान जोरदार राडा झाला आहे. रमाई जयंती असल्यामुळे गावात पूर्वनियोजित मिरवणूक होती. मिरवणूक आणि सभा एकाच वेळी एकाच ठिकाणी आल्याने हा गोंधळ निर्माण झाला. सभास्थळी स्टेज मागून मिरवणूक जात होती, तेव्हा डीजेचा आवाज कमी करायला लावल्याने मिरवणुकीतील कार्यकर्ते संतापले आणि त्यांनी गोंधळ घालायला सुरूवात केली. आदित्य ठाकरे यांनी पूर्ण सुरक्षा यंत्रणेमध्ये भाषण उरकलं. सभा संपल्यानंतर गाडीत बसून जातानाही मिरवणुकीतल्या संतप्त कार्यकर्त्यांनी आदित्य ठाकरेंना अडवण्याचा प्रयत्न केला. तसंच संतप्त कार्यकर्त्यांनी आदित्य ठाकरे यांच्या गाडीवर ठोसे मारले. मात्र मोठ्या पोलीस बंदोबस्तात त्यांना गावाच्या बाहेर नेण्यात आलं. आदित्य ठाकरे गेल्यानंतरही बराच वेळ गावात गोंधळ सुरू होता. आदित्य ठाकरे यांच्या गाडीवर प्लास्टिकचे दोन पाईप फेकण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
चंद्रकांत खैरेंचं भाषण सुरु असताना स्टेजवर दगड भिरकवण्यात आला होता. यानंतर घडलेल्या प्रकारानंतर वाद टाळण्यासाठी आदित्य ठाकरेंनी स्टेजवरून खाली उतरून आवाहन केलं. डीजे वाजवा मात्र वाद नको असं मिरवणुकीतल्या तरुणांना आदित्य ठाकरेंनी सांगितलं. शिवशक्ती-भीमशक्ती एकत्र असल्याची आठवणही आदित्य ठाकरेंनी यावेळी करुन दिली. तसंच भीमशक्ती-शिवशक्ती एकच आहे, तुम्हाला डीजे वाजवाचा आहे तर वाजवा असं सांगितलं. तर शिंदे गटातील आमदारांच्या कार्यकर्त्यांनी आदित्य ठाकरेंवर हल्ला करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केला आहे. संवाद यात्रेनिमित्ताने ठाकरे मराठवाड्याच्या दौऱ्यावर आहेत. भीमशक्ती व शिवशक्ती एकत्र येऊ नये यासाठी काही लोकांनी जाणीवपूर्वक हे कारस्थान केल्याचे ते म्हणाले.
या सर्व प्रकरणाची दखल पोलिसांकडून घेण्यात आली असून, यापुढे आदित्य ठाकरेंच्या शिवसंवाद यात्रेदरम्यान अतिरिक्त पोलिस तैनात असणार आहे. ज्या ठिकाणी संवाद आणि मेळावे होतील त्या ठिकाणी स्थानिक पोलिसांकडून अतिरिक्त सुरक्षा पुरवली जाणार आहे. (Aditya Thackeray Security Increased)