मुंबई (वृत्तसंस्था) राज्यातील कोरोनाची स्थिती दिवसेंदिवस चिंताजनक बनत आहे. याच पार्श्वूभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यात कडक निर्बंध लागू केले आहे. राज्यात उद्या रात्री ८ वाजेपासून १४४ कलम लागू करण्यात आल्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली आहे. आवश्यक कामाशिवाय कुणालाही बाहेर फिरता येणार नाही. पुढीस १५ दिवसांसाठी ही संचारबंदी लागू असणार आहे.
महाराष्ट्रात गेल्या महिन्याभरात सातत्याने वाढत असलेल्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात लॉकडाऊन लागू होणार की कठोर निर्बंध? या मुद्द्यावरून गेल्या काही दिवसांत मोठी चर्चा पाहायला मिळाली. महाराष्ट्रात रुग्णसंख्येसोबतच मृतांचा आकडा देखील वाढू लागला आहे. त्यासोबतच राज्यात ऑक्सिजन, व्हेंटिलेटर या आरोग्य सुविधांची कमतरता देखील जाणवू लागल्याच्या तक्रारी समोर आल्या आहेत. या पार्श्वभूमीवर रुग्णसंख्या आटोक्यात आणण्यासाठी लॉकडाऊन करायला हवा, असा देखील दावा केला गेला. लॉकडाऊन बाबत सर्वच स्तरातून संमिश्र प्रतिक्रिया आल्या. यामध्ये काहींनी लॉकडाऊनचं समर्थन केलं तर काहींनी विरोध केला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यासंदर्भात सर्वपक्षीय नेते, डॉक्टर, मनोरंजन क्षेत्रातील प्रतिनिधी, तज्ज्ञांशी चर्चा देखील केली. या सर्व चर्चांनंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी आज राज्यातल्या जनतेशी सोशल मीडियाच्या माध्यमातून संवाद साधला.
नाईलाजाने आपल्याला काही निर्बंध घालावे लागणार आहेत. चर्चेत आपण बराच वेळ घालवला आहे. आता निर्णय घेण्याचा क्षण आला आहे. आपल्याला रोजीरोटी महत्त्वाची आहेच. पण त्याआधी जीव वाचवणं आवश्यक आहे. सध्या तोच आपल्यासमोरचा महत्त्वाचा मुद्दा आहे. उद्या संध्याकाळी ८ वाजल्यापासून हे निर्बंध लागू होतील. पंढरपूर मंगळवेढ्याचं मतदान आहे. ते झाल्यानंतर तिथे देखील निर्बंध लागू होतील. उद्या संध्याकाळपासून आपण ब्रेक द चेनं लागू करत आहोत. राज्यात १४४ कलम लागू होणार. याचा अर्थ पुढचे किमान १५ दिवस राज्यात संचारबंदी लागू असेल. अनावश्यक प्रवास पूर्णपणे बंद करावा लागेल. योग्य कारण नसेल, तर घराबाहेर पडायचं नाहीये.
राज्यात कोरोनाच्या सद्यस्थितीमुळे वैद्यकीय सुविधेवर भार पडत आहे. रेमडेसिवीर इंजेक्शनची मागणी प्रचंड वाढली आहे. राज्यात ऑक्सिजनची कमतरता भासत आहे. सध्याची स्थिती नियंत्रणात आली नाही तर स्थिती आणखी बिकट होईल, अशी भीती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी वर्तवली आहे.
















