जळगाव (प्रतिनिधी) मला अभ्यासाचा लोड झेपत नाही, त्यामुळे मरायला जातो आहे अशी सुसाईड नोट लिहून एका दहावीच्या विद्यार्थ्याने गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी रात्री ११.१५ वाजेच्या सुमारास उघडकीस आली. तन्मय गजेंद्र पाटील (रा. गणेश कॉलनी), असे मयत विद्यार्थ्याचे नाव आहे.
कुटुंबासोबत जेवण केले आणि त्यानंतर…!
शहरातील ए. टी. झांबरे विद्यालयात दहावीच्या वर्गात शिक्षण घेत असेला तन्मय हा गणेश कॉलनीत वडील अॅड. गजेंद्र पाटील, आई व मोठ्या भावासह वास्तव्यास होता. मंगळवारी रात्री त्याने कुटुंबासोबत जेवण केले आणि त्यानंतर सर्व जण झोपले. त्यानंतर रात्री सव्वा अकरा वाजेच्या सुमारास कुटुंबिय गाढ झोपेत असतांनाच ओढणीच्या सहाय्याने छताच्या कडीला गळफास घेवून आपली जीवनयात्रा संपविली.
मध्यरात्री उघडकीस आली घटना !
तन्मयचे वडीलांना रात्री अचानक जाग आल्यानंतर त्यांना तन्मय जागेवर दिसला नाही. त्यांनी वरच्या खोलीत जाऊन बघितले असता त्यांना तन्मयने गळफास घेतल्याचे दिसून आले. मुलाचा गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसताच त्यांनी काळीज चिरणारा आक्रोश केला. त्यानंतर मुलाला लागलीच जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व शवविच्छेदन झाल्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. यावेळी तन्मयचा मृतदेह बघून नातेवाईकांना देखील अश्रू अनावर झाले होते. तन्मयच्या पश्चात आई, वडील आणि मोठा भाऊ असा परिवार आहे.
वहिच्या पानावर लिहली सुसाईड नोट !
आत्महत्या करण्यापूर्वी तन्मयने आपल्या वहीच्या पानावर सूसाईट नोट लिहून ठेवली होती. यामध्ये त्याने मी मरायला जातो आहे. कारण अभ्यासाचा लोड मला झेपत नाहीये. मी गेल्यावर तरी शांती होईल, चिडचिड होणार नाही. मला नाशिकला जायचे होते. पण आता, अभ्यासाचा लोड इतका होता की, शेवटी मला मरुन जावे लागले. त्यामुळे माझा शेवटचा जय गजानन…!, असे लिहीत तन्मयने आपले जीवन संपविले. पोलिसांनी ती सूसाईट नोट जप्त केली आहे. याप्रकरणी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
शांत अन् संयमी विद्यार्थी !
अभ्यासाच्या तणावातून दहावीच्या विद्यार्थ्याने टोकाचे पाऊल उचलल्यामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. तन्मय हा शाळेत नेहमी हजर राहत होता. तो अत्यंत शांत व संयमी स्वभावाचा असल्याचे त्याच्या शाळेतील शिक्षकांनी सांगितले.
















