चोपडा (प्रतिनिधी) येथील महात्मा गांधी शिक्षण मंडळ संचलित ऑक्सफर्ड इंग्लिश मिडीयम स्कूल चोपडा येथे इयत्ता ६वी ते १०वीच्या पालकांसाठी आणि ९वी व १०वीच्या विद्यार्थ्यांसाठी ‘ध्येय निश्चिती आणि प्रभावी पालकत्व’ कार्यशाळेचे यशस्वी आयोजन करण्यात आले. या कार्यशाळेचे उद्घाटन शाळेच्या मुख्याध्यापिका ममता कपिल न्याती यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यशाळेचे प्रमुख वक्ते कपिल राजमल न्याती यांनी ‘ध्येय निश्चिती आणि प्रभावी पालकत्व’ या विषयावर विद्यार्थ्यांना आणि पालकांना मार्गदर्शन केले.
कॉर्पोरेट व्यवस्थापनातील २० वर्षांचा व्यापक अनुभव असणारे, औरंगाबादमधील व्हिडीओकॉन इंडस्ट्रीज लिमिटेड आणि संगमनेरमधील मालपाणी समूह येथे व्यवस्थापक म्हणून अनुभव असलेले कपिल राजमल न्याती यांचे मुलांच्या वाढीस आणि विकासास समर्थन देण्यासाठी तसेच व्यावहारिक साधनांसह सक्षम करण्यासाठी या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. पालकत्वाची उद्दिष्टे निश्चित करणे आणि ही उद्दिष्टे साध्य करण्यासाठीचे उपाययोजनांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. यामध्ये प्रामुख्याने मुलांशी संवाद सुधारणे, उत्तम दिनचर्या प्रस्थापित करणे या विषयांचा समावेश होता. प्रभावी संप्रेषण, मुलांशी सकारात्मक आणि मुक्त नातेसंबंध जोपासण्यासाठी प्रभावी संवाद तंत्रे जाणून घेण्यात आली. सक्रियपणे ऐकणे, आपल्या भावना व्यक्त करणे आणि संघर्ष रचनात्मकपणे कसे सोडवायचे याविषयी मार्गदर्शन करण्यात आले. काम आणि कौटुंबिक समतोल साधणे, वैयक्तिक जीवन आणि पालकत्वाची आव्हाने या विषयासंदर्भात वेळ व्यवस्थापन आणि निरोगी कार्य-जीवन संतुलन साधण्यासाठी व्यावहारिक टिप्स देण्यात आल्या.
मुलांच्या वाढीस सहाय्य करणे, मुलांच्या भावनिक, सामाजिक आणि बौद्धिक विकासाला समर्थन देण्याचे मार्ग यांविषयी सविस्तर चर्चा करण्यात आली. यासाठी विविध प्रेरक गोष्टींच्या माध्यमातून मार्गदर्शन करण्यात आले. प्रश्नोत्तरी सत्रामध्ये पालकत्वाची कौशल्ये वाढवण्यासाठी आणि मुलांसोबत सकारात्मक नातेसंबंध वाढवण्यासाठी पालकांच्या विविध प्रश्नांना यावेळी समाधानकारक उत्तरे देण्यात आली. कार्यशाळेच्या यशस्वीतेसाठी शाळेच्या मुख्याध्यापिका ममता कपिल न्याती यांचे मार्गदर्शन लाभले. तसेच शाळेचे उपमुख्याध्यापक अमन पटेल यांचे सहकार्य लाभले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जगदीश पाटील यांनी केले. शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची सहकार्य लाभले.
















