धरणगाव (प्रतिनिधी) दोंडायचाहून जळगावच्या दिशेने जाणाऱ्या बसमध्ये एका महिलेची प्रकृती अचानक बिघडली. त्यानंतर चालकाने तातडीने बस धरणगाव थेट ग्रामीण रुग्णालयात आणली. याठिकाणी शिवसेना (ठाकरे गट) च्या पदाधिकाऱ्यांनी महिलेला रुग्णालयात उपचार मिळवून देण्यासाठी पुढाकार घेतला. शेवटचे वृत्त हाती आले तेव्हा सुदैवाने महिलेची प्रकृती आता स्थिर असल्याचे कळते.
या संदर्भात अधिक असे की, दोंडायचा डेपोची जळगाव जाणारी बस क्र.(एमच४०, १७८९) मध्ये मंगलाबाई भिकन पाटील (वय.५५, रा. जळगाव) ह्या आपल्या पतीसह नरडाणा येथून बसल्या. साळवा गाव सोडल्यानंतर मंगलाबाई यांची प्रकृती अचानक बिघडली. त्यांच्या छातीत दुखू लागले. त्यामुळे त्यांना श्वास घ्यायला अडचण येत होती. महिलेची पाटील भिकन पाटील यांनी ही गोष्ट चालक ललित पाटील आणि वाहक जीवन पाटील यांच्या लक्षात आणून दिली. त्यानंतर बस तातडीने थेट धरणगावच्या ग्रामीण रुग्णालयात आणली. याचवेळी शिवसेना ठाकरे गटाचे युवा सेना उपजिल्हा प्रमुख योगेश वाघ तथा जयेश महाजन हे ग्रामीण रुग्णालयात उभे होते. त्यांना बसमध्ये थेट रुग्णालयात आणल्यामुळे काही तरी गोंधळ असल्याचे लक्षात आले. त्यांनी लागलीच बसच्या दिशेने धाव घेतली.
याठिकाणी महिलेची प्रकृती खराब असल्याचे लक्षात येताच दोघांनी तातडीने मंगलाबाई यांना ग्रामीण रुगणालयाच्या आत नेले. नंतर डॉक्टर चौधरी यांना बोलवले. डॉ.चौधरी यांनी मंगलाबाई यांच्यावर उपचार सुरु केले. मंगलाबाई यांचा रक्तदाब (बिपी) वाढल्यामुळे त्यांची प्रकृती खराब झाल्याचे डॉ. चौधरी यांनी सांगितले. योग्यवेळी सर्वांनी धावपळ केल्यामुळे मंगलाबाई यांना वेळेवर उपचार मिळू शकलेत. दरम्यान, मंगलाबाई यांचे पती शरद पाटील यांनी चालक ललित पाटील, वाहक जीवन पाटील आणि योगेश वाघ तथा जयेश महाजन यांच्यासह बसमधील सहप्रवाशांचे मदतीबद्दल आभार मानले.