जळगाव (प्रतिनिधी) कारागृहातील बंदीवान चिन्या ऊर्फ रविंद्र जगताप कारागृह अधीक्षक, तुरूंगाधीकारी व कर्मचाऱ्यांच्या मारहाणीत मृत्यु झाल्याचा आरोप कुटूंबीयांनी केला होता. या प्रकरणात कारागृह अधीक्षक पेट्रस गायकवाड यांनी आज न्यायालयात आपले म्हणणे सादर केले.
शहर पोलीस स्टेशनला दाखल गुन्ह्यामध्ये रवींद्र उर्फ चिन्या जगताप हा जिल्हा कारागृहात न्यायालयीन कोठडीमध्ये होता. घटनेच्या दिवशी ता.११ सप्टेंबर रोजी चिन्या जगतापचा मारहाणी नंतर संशयास्पद मृत्यू झाला. त्यानंतर कारागृह अधीक्षक पेट्रस गायकवाड, जितेंद्र माळी यांच्यासह संबंधित दोषींवर खुनाचा व पुरावा नष्ट केल्याचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी चिन्याची पत्नी मीना जगताप हिने केली होती. तसेच या प्रकरणाची न्यायालयीन चौकशी देखील सुरु आहे. या प्रकरणात प्रत्यक्षदर्शी साक्षिदार मनोज जाधव व सचिन कोरके यांची साक्ष नोंदविल्या नंतर आज जळगाव जिल्हा कारागृहातील अधीक्षक पेट्रस गायकवाड याचे म्हणणे जिल्हा न्यायालयातील न्या. डी. बी. साठे यांच्या न्यायालयात नोंदविण्यात आले.
न्यायालयात या प्रकरणाची चौकशी सुरु असून दोन कारागृह रक्षकांनी या मारहाणी बाबत न्यायालयात नुकतीच साक्षही नोंदवली आहे. आज कारागृह अधीक्षक पेट्रस गायकवाड यांना हजर राहण्याचे समन्स बजवण्यात आल्याने ते न्यायालया समोर हजर झाले होते.