नवी दिल्ली (वृत्तसंस्था) राष्ट्रवादीच्या बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे यांना सलग सातव्यांदा संसदरत्न पुरस्कार देण्यात आला आहे. चेन्नईच्या प्राईम पॉइंट फाउंडेशनकडून हा पुरस्कार देण्यात आला आहे. यावर्षी देशातील 11 खासदारांना हा पुरस्कार देण्यात आला असून, त्यात महाराष्ट्राच्या चार खासदारांचा यात समावेश आहे.
शिवसेनेचे श्रीरंग बारणे, राष्ट्रवादीच्या फौजिया खान, भाजपच्या हीना गावित यांना देखील संसदरत्न पुरस्कार मिळाला आहे. कामगिरीतल्या सातत्याबद्दल सुप्रिया सुळे आणि श्रीरंग बारणे यांना “संसद विशिष्ट रत्न’ पुरस्कार असणार आहे. चेन्नई येथील प्राईम पॉइंट फाउंडेशनच्या वतीने देण्यात येणारा संसदरत्न 2022 हा पुरस्कार राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे, शिवसेनेचे खासदार श्रीरंग बारणे, भाजप खासदार हिना गावित आणि राष्ट्रवादीच्या राज्यसभेच्या खासदार फौजिया खान यांना देण्यात येत असल्याची माहिती फाउंडेशनच्या वतीने जाहिर करण्यात आली आहे.
यंदा एकूण 11 जणांना हा पुरस्कार जाहिर करण्यात आला आहे. सुप्रिया सुळे सलग सातव्यांदा संसदरत्न पुरस्काराच्या मानकरी ठरल्या आहेत. यंदा ज्या अकरा जणांना हा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे यामधे महाराष्ट्रातील 4 खासदारांचा समावेश आहे तर रिव्हॉलुशनरी सोशलिस्ट पक्षाचे खासदार एन. के. प्रेमचंद्रन तृणमूल काँग्रेसचे खासदार सौगत रॉय, काँग्रेसचे खासदार कुलदीप राय शर्मा आणि भाजपचे खासदार विद्युत बरान महातो, सुधीर गुप्ता राज्यसभेतील बिजू जनता दलाचे खासदार अमर पटनायक, कम्युनिट पार्टीचे खासदार के. के. रागेश यांचा देखील समावेश आहे.