मुंबई (वृत्तसंस्था) शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या मुलीचा विवाहसोहळा नुकताच पार पडला. दरम्यान लग्नाआधी पार पडलेल्या संगीत कार्यक्रमातील संजय राऊत आणि सुप्रिया सुळेंच्या डान्सचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला होता. दरम्यान यावरुन काहींनी टीकादेखील केली होती. या टीकेला सुप्रिया सुळे यांनी उत्तर दिलं आहे. तो एक कौटुंबिक कार्यक्रम होता. आमच्या घरातल्या मुलीचं लग्न होतं, असं सुळे म्हणाल्या.
तो एक कौटुंबिक कार्यक्रम होता. बाहेरचं कुणीच नव्हतं. अगदी आम्ही ५० लोकही एकत्र नव्हतं. आमच्या घरातल्या मुलीचं लग्न होतं. आम्ही सदानंद, मिसेस राऊत, मुलं असे सगळे त्या कार्यक्रमात होते. एखाद्या प्रायव्हेट फंक्शनमध्ये आम्ही काय करतो त्यावर पण जर कुणाला टीका करायची असेल तर त्यावर काय बोलणार? अशी प्रतिक्रिया सुप्रिया सुळे यांनी दिली आहे.
दरम्यान, भाजप नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी सुप्रिया सुळे आणि संजय राऊत यांच्यावर टीका केली होती. एसटी कर्मचारी आत्महत्या करत आहेत, शेतकरी आत्महत्या करत आहेत आणि तुम्ही काय करता तर लग्नात नाचता. लग्नात तुम्ही नृत्य करता. एकीकडे लोक आत्महत्या करत आहेत. दुसरीकडे वीज कनेक्शन तोडले जात आहेत. गावची गावे अंधारात आहेत. जनाची नाही तर मनाची तरी ठेवा, हीच महाविकास आघाडीची कर्तबगारी आहे का? असा खोचक सवाल विखे-पाटील यांनी केला होता.