जळगाव (सुरेश उज्जैनवाल) खान्देशातीलच नव्हे, तर महाराष्ट्राच्या राजकारणातील असामान्य नेतृत्व आणि कर्तृत्वाची जगा वेगळी, विलक्षण धडाडी असलेला नेता म्हणून नावलौकिक असलेल्या सुरेशदादा जैन यांचा वाढदिवस… आज ते कोणत्याही राजकीय पदावर नाहीत, तरी देखील उत्तरोत्तर त्यांची उणीव जनमानसात भासते आहे, हे देखील खान्देशातील एकमेव उदाहरण असून आणि हीच त्यांच्या लोकप्रियतेची पावती देखील आहे.अश्या या स्वयंप्रकाशित आणि सिंगल आर्मी नेत्याचे अभिष्टचिंतन आणि हृदयापासून शुभेच्छा…!
व्यक्ती आणि सर्वसामान्य लोकांचा, सर्वच समाजाचा निर्विवाद लोकनेता म्हणून सुरेशदादांच्या गुणवैशिष्ट्याचे विश्लेषण पत्रकार म्हणून या निमित्ताने करण्याचा हा छोटासा प्रयत्न…!
सार्वजनिक जीवनात अथवा राजकीय क्षेत्रात नावलौकिक प्राप्तीसाठी स्वप्रयत्नांसह व्यक्तिला पक्ष किंवा संख्यात्मक समाजाची साथ महत्वाची असते किंवा बड्या, प्रमुख नेत्याचा आशीर्वाद तरी लागतो. मात्र दादा ही व्यक्ती याला अपवाद ठरली आहे. जो स्वतःशी प्रामाणिक असतो तोच समाजासाठीही प्रामाणिक ठरतो, असा सर्वसामान्य समज आहे आणि खराही आहे. जे बोलायचं तेच निष्ठेने अमलात आणायचं, मग त्यासाठी कुठलीही किंमत मोजायची वेळ आली, तरी मागे हटायचं नाही, अशी बाजीगरी फक्त सुरेशदादांच्या व्यक्तिमत्वात अनुभवास येते, समाजाच्या सार्वजनिक हितासाठी हाती घेतलेल्या विषयात कोणत्याही परिस्थितीत हार न मानणे आणि तडजोडही न स्वीकारणे हा स्वभाव व गुण जोपासण्याची जी हातोटी दादांच्या व्यक्तिमत्वात आढळते, ती विद्यमान परिस्थितीत कोणत्याही नेत्यांमध्ये दिसून येत नाही.
उदाहरण म्हणून भुसावळ शहरातील एका घटनेचा उल्लेख करावासा वाटतो. नोव्हेंबर 2006 भुसावळमधील ही घटना आहे. (योगायोग असा, की दादाचा जन्म नोव्हेंबर) भुसावळ शहरातील तापी नदीवरील पुलाच्या बांधकामाचा प्रश्न रखडला होता. बांधकामासाठी निधी मंजूर झालेला होता, कॉन्ट्रॅक्टरला कामाची वर्कऑर्डरही मिळालेली होती, मात्र स्थानिक लोकप्रतिनिधींकडून अडवणूक केली जात होती. शासकीय पातळीवरून प्रयत्न करूनही अडवणुकीस लगाम घालता येत नव्हता, दुसरीकडे अरूंद पुलामुळे वाहनांची आणि पर्यायाने नागरिकांची कुचंबणा होत होती, तेंव्हा कॉन्ट्रॅक्टरने जळगावला येऊन दादांकडे आपली कैफियत मांडली. प्रश्नाचे गांभीर्य लक्षता घेत दादांनी ठेकेदारास सांगितले, तापी पुलाच्या कामाची सुरुवात मी तेथे येऊन करतो तुम्ही बांधकाम साहित्य व मजूर सज्ज ठेवा, कोण दादागिरी करतो, अडवणूक करतो ते बघूया.. असा विश्वास संबंधित ठेकेदारास दिला व थेट भुसावळच्या तापी पुलावर धडक देत काम सुरू केले. दादांची ही धडाडी व निडरता बघून भुसावळची जनता ही स्तंभित झाली, उपस्थित लोकांनी दादांच्या नावाचा जयघोष करीत त्यांच्या योगदानाचे भरभरून कौतुक केले. जनतेच्या भल्यासाठी कुणाशीही भिडण्याच्या या वृत्तीचं जिल्ह्याच्या राजकारणात दुसरे उदाहरण नाही.
नामोहरम करणारे आता स्तुती करताहेत
जळगाव शहराची कमालीची वाताहत झाली आहे. गेल्या दहा वर्षात एकही नवीन रस्ता अथवा विकासाचं काम झालेलं नाही. खराब रस्त्यांमुळे शहराच्या लौकिकास बाधा पोहचत आहे, रस्त्यांअभावी अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत. वर्षभरात जळगाव शहराचा चेहरामोहरा बदलून टाकण्याच्या थापा मारत चार वर्षात सत्तेत आलेले एक रस्ताही नीट करू शकलेले नाहीत, पक्षीय राजकारण व एकमेकांचे चिरहरण मात्र सुरू आहे. अश्यातच आमदार एकनाथराव खडसे यांनी शहरातील खराब रस्त्यांची पाहणी करीत सुरेशदादांच्या काळात किती परफेक्ट नियोजन होते, विकासकामे कशी दर्जेदार होत होती, अशी स्तुती करून दादांच्या कामकाज पद्धतीचे कौतुक केले. मात्र एकनाथराव खडसेंनी भाजपमध्ये असताना दादांना नामोहरम करण्याची एकही संधी सोडली नव्हती.
पारदर्शकता आणि जळगाव प्रति विलक्षण आस्था
शहर विकासासाठी दादांनी व्यक्तिगत पातळीवर वेळोवेळी मोठी किंमत मोजली आहे. विकासाचं दादा मॉडेल कुठेही नव्हतं, दर्जेदार गुणवत्तापूर्ण काम आणि पारदर्शकता हेच दादांच्या सार्वजनिक जीवनातील बलस्थान होय.
श्वेत पत्रिका सादर करीत सत्ता सोडली
सन 2002 मध्ये थेट नगराध्यक्षाच्या झालेल्या निवडणुकीत दादांच्या उमेदवाराचा पराभव झाला. त्यावेळी दादांच्या नेतृत्वाखालील गटाची सत्ता गेली. सत्तेतून पायउतार होत असताना जळगावच्या जनतेला नगरपालिकेची आर्थिक स्थिती, केलेला विकास, मालमत्ता तसेच पालिकेवरील दायित्वाची माहिती व्हावी, म्हणून पत्रकार परिषद घेत लेखी माहिती पत्रकारांना दिली. अशा पद्धतीने माहिती देऊन जनतेला जागृत करणारे, ते एकमेव नेते.
आता शहराची झालेली बकाल अवस्था लक्षात घेत लोकांना दादांच्या कामाची व नेतृत्वाची उणीव भासू लागली आहे. लोकांमधून त्यांच्या विषयी उमटणाऱ्या भावना, प्रतिक्रिया हीच दादांची खरी कमाई… त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देतानाच दीर्घायुष्य लाभो हीच परमेश्वर चरणी प्रार्थना…!
सुरेश उज्जैनवाल, (ज्येष्ठ पत्रकार, जळगाव)