नवी दिल्ली (वृत्तसंस्था) पेगासस प्रकरणावरुन केंद्र सरकारवर विरोधकांकडून जोरदार टीका होत असताना रिपब्लिकन पक्षाचे नेते रामदास आठवले यांनी मोदी सरकारची बाजू मांडताना विरोधकांना खडेबोल सुनावले आहेत. यासोबतच संसदेत गोंधळ घालून काम न होऊ देणाऱ्या खासदारांचं दोन वर्षांचं निलंबन करण्याचा नियमच सरकारनं बनवला पाहिजे, अशी मागणी देखील त्यांनी केली आहे.
“केंद्र सरकारकडे स्पष्ट बहुमत आहे. त्यामुळे आम्हाला कोणावरही पाळत ठेवण्याची गरज नाही. फोन टॅपिंगची गरज नाही. पेगासस बाबतचा केंद्र सरकारवरील आरोप बिनबुडाचा आहे. केंद्र सरकार सर्व विषयांवर चर्चा करण्यास तयार आहे. मात्र, विरोधक चर्चा न करता संसदेत गोंधळ घालत आहेत. त्यामुळे सलग 3 दिवस गोंधळ घातल्यानंतर चौथ्या दिवशीही जो खासदार आपली जागा सोडून मर्यादेबाहेर वर्तन करून गोंधळ घालत संसदेचे कामकाज रोखण्याचा प्रयत्न करेल, अशा गोंधळी खासदारांना २ वर्षांसाठी निलंबित करण्याचा नियम सरकारने बनवावा,” अशी मागणी रामदास आठवले यांनी केली आहे.
कोणत्याही विषयावर संसदेत चर्चा व्हावी, एका मर्यादेपर्यंत विरोध प्रदर्शन व्हावे, मात्र विरोधासाठी संसदेचे कामकाज रोखणे अत्यंत चूक आहे. सलग तीन दिवस गोंधळ घालून संसदेतील कामकाज रोखणे चूक आहे. यामुळे संसदेचा बहुमोल वेळ वाया जातो. त्यातून देशाचे नुकसान होते. त्यामुळे सलग तीन दिवस गोंधळ घातल्यानंतरही जो खासदार चौथ्या दिवशी संसदेत गोंधळ घालेल त्यास दोन वर्षांसाठी निलंबित करावे. सरकार पक्षाचा असो की विरोधी पक्षाचा खासदार असो सर्व खासदारांसाठी हा नियम बनवावा, अशी मागणी आठवले यांनी केली.
महाराष्ट्रात रायगड जिल्ह्यातील महाडमध्ये एनडीआरएफचा बेस कॅम्प उभारण्याची मागणी पुढे आली आहे. या मागणीला माझा पाठिंबा असून त्यासाठीचा प्रस्ताव आल्यास केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे आपण प्रयत्न करू, अशी माहितीही आठवले यांनी दिली. तसेच आगामी २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत ‘खेला होबे नाही’ तर मोदींच्या समर्थनाचा मेळा होणार आहे. आगामी २०२४ च्या लोकसभेच्या निकालानंतर पुन्हा पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात एनडीएचे सरकार स्थापन होईल, असे आठवले म्हणाले. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वात किती राजकीय पक्ष एकत्र येतील हा प्रश्नच आहे. विरोधी पक्षात कोणी एक नेता नाही. त्यामुळे मोदींसमोर कोणतेही मोठे आव्हान नाही, असे आठवले म्हणाले.