जळगाव (प्रतिनिधी) कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी जळगाव आर्थिक गुन्हे शाखेतील पोलिस उपनिरीक्षक महेश घायतड यांचे जळगाव जिल्हा पोलिस अधीक्षक एम.राजकुमार यांनी निलंबन केल्याने जिल्हा पोलिस दलात प्रचंड खळबळ उडाली आहे.
बोदवड तालुक्यातील एका प्रकरणाचा जळगाव आर्थिक गुन्हे शाखेकडून तपास सुरू आहे. मात्र, या गुन्ह्यातील संशयिताविरोधात कारवाई करण्यात न आल्याने व तपासात निष्काळजीपणा करण्यात आल्याची बाब जळगाव पोलिस अधीक्षक एम.राजकुमार यांच्या निदर्शनास आली होती. त्यामुळे त्यानी तत्काळ प्रभावाने पोलिस उपनिरीक्षक महेश घायतड यांचे निलंबनाचे आदेश काढले आहेत. तसेच याबाबतचे आदेश संबंधित अधिकार्यास बजावण्यात आले आहेत. दरम्यान, गुन्ह्याच्या तपासात निष्काळजीपणा केल्यास निश्चितपणे कारवाई होईलच, असेही पोलिस अधीक्षक एम.राजकुमार यांनी म्हटले आहे.