नागपूर (वृत्तसंस्था) राजकारण आपलं होतं, मात्र जीव जनतेचा जातो म्हणत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नाराजी व्यक्त करत विरोधकांना सुनावलं होतं. दरम्यान मुख्यमंत्र्यांच्या या वक्तव्यावर देवेंद्र फडणवीस यांनी टीका केली आहे. “समोरच्यांना बोलायच्या ऐवजी आपल्या सोबतच्यांना, आपल्या पक्षातील लोकांना पहिलं शिकवावं आणि मग आम्हाला सांगावं,” असा टोला फडणवीसांनी लगावला आहे.
उद्धव ठाकरे यांनी माझा डॉक्टर परिषदेत बोलताना मंदिरं उघडण्याच्या आंदोलनांवरुन टीक करताना म्हटलं होतं की, “अनेकांनी राज्यात मंदिरं उघडा या मागणीसाठी आंदोलनं केली. तुम्ही आंदोलनं करा, अवश्य करा. पण कोरोनाविरुद्ध आंदोलन करा. आपण राजकारण करतो आणि त्यात जीव मात्र सामान्य जनतेचा जातो. हे चुकीचं आहे. असं व्हायला नको”.
“महाविकास आघाडी सत्तेसाठी नव्हे तर सत्तेचे लचके तोडण्यासाठी तयार झाली आहे. प्रत्येकजण सरदार असल्यासारखा वागत आहे. जितके लचके तोडता येतील तेवढे तोडत असून नाही तोडता आले तर एकमेकांचे लचके तोडा अशी अवस्था आहे,” अशी टीका देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी केली.
करुणा शर्मा पिस्तूल प्रकरणी चौकशी व्हावी
“यासंदर्भात सखोल चौकशी झाली पाहिजे. प्रत्येकाला बोलण्याचा अधिकार आहे, त्यापासून कोणाला वंचित ठेवण्याचं कारण नाही. त्या ठिकाणी जे काही घडलं आहे त्यावरुन कायदा-सुव्यवस्था कशी राखली जात आहे हे स्पष्ट होत आहे. जे आरोप प्रत्युत्तर होत आहेत आणि मिळालेलं पिस्तूल हे गंभीर असून यासंदर्भात कोणत्याही दबाबाशिवाय चौकशी झाली पाहिजे”, अशी मागणी देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.