मुंबई (वृत्तसंस्था) राज्यातील शिक्षकपद भरतीसाठी प्रक्रिया सुरु झाली असून पहिल्या टप्प्यात २०६२ रिक्त पदं भरण्यात येत आहेत. त्यासाठी एकूण ३९०२ उमेदवारांची मुलाखतीसाठी शिफारस करण्यात आल्याची घोषणा राज्याच्या शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी केली आहे. शिक्षक भरतीच्या प्रक्रियेबाबतचं एक ट्विट गायकवाड यांनी केलं आहे.
“पवित्र पोर्टलच्या माध्यमातून ५६१ खासगी व्यवस्थापनाच्या २०६१ रिक्त पदांसाठी १५१२३ पसंतीक्रमावर ३९०२ उमेदवारांची मुलाखतीसाठी शिफारस करण्यात येत आहे. उमेदवारांना मुलाखतीसाठी हार्दिक शुभेच्छा!”, अशी माहिती वर्षा गायकवाड यांनी ट्विटमध्ये दिली आहे.
शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी ८ जुलै रोजी राज्यातील सुमारे ६ हजार १०० शिक्षण सेवकांच्या पदभरतीचा मार्ग मोकळा झाला आहे, अशी माहिती दिली होती. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि महसलूमंत्री बाळासाहेब थोरात यांनी भरती प्रक्रियेला सध्या लागू असलेल्या पदभरती बंदीतून वगळण्याचा प्रस्ताव मान्य केला आहे, अशी माहिती त्यांनी दिली होती.