चाळीसगाव (प्रतिनिधी) सचिव व मुख्याध्यापकासह क्लार्कने शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी व शासनाची फसवणूक केल्याची घटना समोर आली आहे. एकूण 15 शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची फसवणूक करून 97 लाख रुपये लाटण्यात आले आहे. याप्रकरणी चाळीसगाव पोलीस स्थानकात सचिव व मुख्यध्यापकासह क्लार्कविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
चाळीसगाव तालुका पंचायत समितीतील तालुका विस्तार अधिकारी विलास आनंदा भोई वय (50 रा. उंटवाडी तिळकेनगर, नाशिक) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, विलास भोई हे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे कामकाज पाहतात. चाळीसगाव शहरात महात्मा फुले सामाजिक व शैक्षणिक विकास मंडळ संचलित जय हिंद माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय ही शाळा मालेगाव रोड लगत आहे. ही शिक्षण संस्था खाजगी अनुदानित असून सध्या या संस्थेचे सचिव अशोक हरी खलाणे (रा. नेताजी चौक चाळीसगाव) हे असून मुख्याध्यापक अभिजीत जगन्नाथ खलाणे (रा. धुळे रोड जयहिंद हायस्कूलजवळ चाळीसगाव) व क्लर्क ज्ञानेश्वर दगा महाजन (रा. तेजस कोणार्क धुळे रोड चाळीसगाव) हे आहेत. शिक्षण संस्थेतील सर्व कामकाज हेच पाहतात. दरम्यान जय हिंद माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचे शासनाकडून येणाऱ्या पगाराच्या अनुदानातून सचिव, मुख्याध्यापक व क्लर्क यांनी काही शिक्षकांना नोकरीवरून काढून टाकण्याची धमकी दिली. एवढेच नाही तर बळजबरीने संमती पत्रावर सह्या घेतल्या आहेत व काही शिक्षकांची कोणत्याही प्रकारे संमती न घेता बेकायदेशीररित्या व शासनाचा कोणताही नियम व आदेश 2006 पासून ते डिसेंबर 2024 पर्यंत शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांच्या पगारातून स्वतःच्या फायद्यासाठी रक्कम कपात केली आहे. एकूण 15 शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या पगाराच्या अनुदानातून 97,01,100 रुपये इतकी रक्कम कपात करण्यात आलेली आहे.