पाटणा (वृत्तसंस्था) अंत भला तो सब भला”, अशा शब्दाक राजकीय संन्यासाचे संकेत देणाऱ्या नितीश कुमार यांचा शेवट गोड होणार? की तेजस्वी यादव यांच्या माध्यमातून बिहारला सर्वात तरुण मुख्यमंत्री मिळणार हे अवघ्या काही तासांत स्पष्ट होणार आहे. बिहार विधानसभा निवडणुकीचा निकाल आज लागत आहे. अशावेळी बिहारमध्ये कुणाची सत्ता येणार? याकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलं आहे.
बिहार विधानसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातील शेवटच्या प्रचारसभेत नितीशकुमार यांनी बिहारच्या जनतेला भावनिक आवाहन केलं होतं. ही निवडणूक आपली शेवटची निवडणूक असल्याचं नितीश कुमार यांनी धमदाह इथे झालेल्या JDU उमेदवाराच्या प्रचासभेत सांगितलं होतं. ही आपली शेवटची निवडणूक आहे. शेवट गोड झाला तर सर्व काही चांगलं होतं, असं भावनिक वक्तव्य नितीश कुमार यांनी केलं होतं. नितीश कुमार यांच्या या वक्तव्यावर काँग्रेसकडून जोरदार टीकाही झाली होती. RJDचे नेते तेजस्वी यादव यांना विजयाचा विश्वास आहे. तिसऱ्या टप्प्यातील मतदानानंतर प्रसिद्ध झालेल्या एक्झिट पोलमध्ये RJD आणि काँग्रेस यांच्या महाआघाडीला बहुमत मिळत असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. एक्झिट पोलच्या अदांजानुसार महाआघाडीची सत्ता आली तर तेजस्वी यादव बिहारचे आणि भारतातील एखाद्या राज्याचे सर्वात तरुण मुख्यमंत्री ठरणार आहेत. तेजस्वी यादव यांनी नुकताच आपला ३१ वा वाढदिवस साजरा केला.