पेठ (वृत्तसंस्था) नाशिक – पेठ राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ८४८ वर पेठजवळील हॉटेल शिवमल्हार ढाब्यानजीक सोमवारी दि. (१९) रोजी रात्री अकरा वाजेच्या सुमारास भरधाव ट्रकने दुचाकीला चिरडल्याने भीषण अपघात झाला. या अपघातात दुचाकीवरील तीन जण जागीच ठार झाले असून एक जण गंभीर जखमी झाला आहे. लहू लिलके, कमलाकर पानडगळे व योगेश पानडगळे असे अपघातात ठार झालेल्या तरुणांची नावे आहेत.
नाशिकरस्त्याने पेठकडे येणाऱ्या दुचाकीस गुजरातकडुन नाशिककडे जाणारी ट्रक क्रमांक एम एच २८ बीबी ०१०७ ने जोरदार धडक दिल्याने भीषण अपघात झाला. या अपघातात दुचाकीवरील तिघे चिरडले जावुन जागीच ठार झाले. तर एक गंभीर जखमी झाला असुन त्यास अधिक उपचारासाठी नाशिक जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले आहे. या अपघातात दुचाकीवरील लहू सुदाम लिलके (वय १६, रा. कोचरगाव, ता. दिंडोरी, जि. नाशिक), कमलाकर नामदेव पानडगळे (वय २५, रा. भायगाव ता. पेठ) , योगेश अरूण पानडगळे (वय १९, रा. भायगाव ता.पेठ, जि. नाशिक) हे जागीच ठार झाले. तर दुचाकीवरील चौथा तरुण सागर शकंर पानडगळे (रा. भायगाव) हा गंभीर जखमी झाला असुन त्यास जिल्हा रूग्णालयात उपचारासाठी पाठविण्यात आले.
या प्रकरणी सुदाम रामभाऊ लिलके (रा. कोचरगाव) याच्या फियार्दीवरून संशयित ट्रक चालक महमंद गौस एम अब्दुल जबरसाब (रा. अरनरी ता. ओसपेठ जि. बल्लारी, कर्नाटक) याच्याविरुद्ध पेठ पोलीस ठाण्यात अपघाताचा गुन्हा दाखाल करण्यात आला आहे. याबाबत पोलीस उपनिरीक्षक के. एम. दरगुडे, पोहवा. डी. आर. डगळे, रविंद्र तांदळे आदी अधिक तपास करीत आहेत.