जळगाव (प्रतिनिधी) टीईटी पेपर गैरव्यवहारात (tet scam maharashtra) चाळीसगावच्या एकासह दोघा मुख्य एजंटांना सायबर पोलिसांनी नाशिकहून अटक केली आहे. दरम्यान, यानिमित्ताने अटकसत्राची दिशा आता जळगाव जिल्ह्याच्या दिशेने वळल्याचे समोर येत असून जिल्ह्यातील यावल, पारोळा, भडगाव तालुक्यातील एजंट रडारवर असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
यांना केलीय अटक
जळगाव, भडगावसह यावल व पारोळा तालुक्यातील काही एजंटाकरवी या गैरव्यवहाराला मोठी चालना देण्यात आली होती. चौकशीनंतर तपासाची दिशा त्यांच्यादिशेने असेल, हे आता स्पष्ट झाले आहे. दरम्यान, जी.ए. सॉफ्टवेअरचा संचालक डॉ. प्रीतीश देशमुख याच्याबरोबर सुरंजित गुलाब पाटील (वय ५०, रा. उत्तरानगर, नाशिक), स्वप्निल तीरसिंग पाटील (रा. शिक्षक कॉलनी, चाळीसगाव, जळगाव) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. त्यांना गुरुवारी न्यायालयाने ११ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी मंजूर केली.
२ कोटी ३५ लाख रुपये वेळोवेळी दिल्याचे कबूल
सरकारी वकील विजयसिंह जाधव यांनी न्यायालयात सांगितले की, स्वप्निल पाटील शिक्षक असून सुरंजित पाटील टेक्निशियन आहे. त्यांनी टीईटी परीक्षा गैरव्यवहार प्रकरणात अंकुश हरकळ व संतोष हरकळ यांच्यांशी संपर्क करून २०१८-१९ या परीक्षेसाठी बसलेल्या परीक्षार्थ्यांना पात्र करण्यासाठी कट रचला. सुरंजित पाटील याने २०१९च्या परीक्षेसाठी २०० परीक्षार्थ्याकडून प्रत्येकी १ लाख १० हजार रुपये घेऊन या परीक्षार्थ्यांची यादी व २ कोटी ३५ लाख रुपये अंकुश व संतोष हरकळ यांच्याकडे वेळोवेळी दिल्याचे कबूल केले आहे.
चाळीसगावच्या स्वप्निल पाटीलचा असा आहे गुन्ह्यात सहभाग
स्वप्निल याने २०१९च्या परीक्षेला बसलेल्या १५० परीक्षार्थ्यांकडून प्रत्येकी १ लाख १० हजार रुपये घेऊन त्यांची यादी व १ कोटी ५० लाख रुपये इतकी रक्कम अंकुश व संतोष हरकळ यांना दिली आहे. दरम्यान, जी.ए. सॉफ्टवेअरचा संचालक डॉ. प्रीतीश देशमुख याच्याबरोबर अटक करण्यात आलेल्या सुरंजित गुलाब पाटील, स्वप्निल तीरसिंग पाटील या दोघा मुख्य एजंटांनी ३५० परीक्षार्थ्याचे तब्बल ३ कोटी ८५ लाख रुपये देणाऱ्या दोघा शासकीय कर्मचाऱ्यांना दिले असल्याचे देखील तपासात उघड झाले आहे.