मुंबई (वृत्तसंस्था) महाराष्ट्र सरकारने महिला पोलिसांबाबत मोठा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्र राज्याचे पोलीस महासंचालक संजय पाडे यांनी पोलीस दलातील महिला कर्मचाऱ्यांना आता आठ तासाची ड्युटी देण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती दिलीय.
सध्या पोलीस दलात कर्तव्य बजावणाऱ्या महिलांना १२ तास काम करावे लागत आहे. महिला पोलिसांना कामाबरोबरच कुटुंबाची जबाबदारी देखील पार पाडत तारेवरची कसरत करावी लागते. अनेक वेळा सणासुदीच्या दिवशी, बंदोबस्त, गंभीर गुन्हे यानिमित्ताने वर्षभरातून अनेक वेळा १२ तासापेक्षा जास्त कर्तव्य पोलिसांना बजवावे लागते. त्यामुळे त्यांच्या कुटुंबाच्या जबाबदारीवर आणि कर्तव्यावर परिणाम होत असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे.
सुप्रिया सुळे यांच्याकडून निर्णयाचं स्वागत
महाराष्ट्र सरकारने महिला पोलिसांच्या कामाचे तास बारा तासांहून आठ तास करण्याचा निर्णय घेतला आहे. हा अतिशय चांगला निर्णय असून पोलीस दलासाठी एक खुशखबर आहे. यामुळे अनेक महिला पोलीस कर्मचाऱ्यांना कुटुंब आणि नोकरी यामध्ये चांगला असा ताळमेळ घालणं शक्य होणार आहे. हा निर्णय घेतल्याबद्दल राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांच्यासह संपूर्ण मंत्रीमंडळाचे मनापासून आभार’, असे ट्वीट खासदार सुप्रिया सुळे यांनी केले आहे.