जळगाव (प्रतिनिधी) मराठा आरक्षण भाजपाच्या फडणवीस सरकारने पाच वर्षे टिकवले, ते बिघडविण्याचे काम ठाकरे सरकारने केल्याचा आरोप भाजपचे महाराष्ट्र प्रदेश सचिव निलेश राणे यांनी आज जळगावात एका पत्रकार परिषदेत केला. मराठा समाजाला एकत्र करून त्यांचे तीव्र आंदोलन भाजपाच्या माध्यमातून उभे करणार असल्याचा इशारा देखील यावेळी राणे यांनी दिला.
मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर आढावा घेण्यासाठी निलेश राणे हे राज्यात दौरा करत आहेत. ते सोमवारी जळगावात आलेले होते. भाजपाच्या वसंतस्मृती कार्यालयात त्यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी ते बोलत होते.
मराठा आरक्षणाचा घोळ ठाकरे सरकारने केला. विषय समजून घेण्याचा प्रयत्न केला नाही. सरकारमधील मंत्र्यांना विषय लक्षात येत नाही, एकही अभ्यासू व्यक्ती या सरकारमध्ये नाही. मराठा आरक्षणाचा विषय आता पेटत चालला आहे, तो आता थांबणार नाही. आजपर्यंत सरकार खोट बोलले, तेच त्यांच्या अंगाशी येत आहे. आरक्षण टिकले नाही. त्याला ठाकरे सरकार कारणीभूत आहे. वेगवेगळ्या राज्यांचे जे संदर्भ द्यायचे असतात, ज्या नोंदी द्यायच्या असतात, ते संदर्भ ठाकरे सरकारने आणि त्यांच्या वकिलांनी दिलेच नाहीत. कारण मराठा आरक्षणासाठी त्यांनी संघटितपणे बैठकच घेतली नाही. अशोक चव्हाण हे समितीत असल्याने आरक्षण मिळणार नाही, ते न्यायालयाकडून नाकारले जाणार हे आम्हाला आधीच माहिती होते. ठाकरे सरकारने अहवालात मराठी भाषांतर केले पण ॲनेक्चरमध्ये केले नाही. जे न्यायाधीश बसले आहेत त्यांना काय मराठी वाचता येत नाही. म्हणून हे सारे जाणूनबुजून झाले आहे का? तर हो माझ्या मनात ही शंका नाही तर हे जाणूनबुजून झाले आहे. भोसले समिती बसली, त्यांनी आम्ही जे सांगत होतो, तेच सांगितले आहे. एकही वाक्य इकडे तिकडे नाही. सर्वोच्च न्यायालयाने तुम्ही रिव्ह्यू टाकू शकत नाही, असे म्हटलेले नाही. रिव्ह्यू केंद्र सरकारने टाकला पण राज्य सरकारने अजूनपर्यंत टाकला नाही. आरक्षणासाठी मागास आयोग स्थापन करावा लागेल, हे सरकारच्या महिना दीड महिन्यापूर्वी लक्षात आले. मागासलेपणा सिद्ध झाल्यानंतर तो अहवाल राज्यपाल आणि त्यानंतर राष्ट्रपतींकडे जातो. मग काय हवी ती घटनादुरुस्ती होते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना काही आहे, असे वाटत नाही तर उपमुख्यमंत्री अजित पवारांना काही माहिती नाही, अशातच मराठा आरक्षणाचा विषय अडकला आहे, असे राणे म्हणाले.
मराठा आरक्षणाच्या विषयातील कुठलाही तांत्रिक मुद्दा उद्धव ठाकरेंनी हातात कागद न घेता स्पष्ट करावा, मी काहीही हरायला तयार आहे, असे थेट आव्हान निलेश राणेंनी यावेळी दिले. ठाकरे बोलूच शकत नाही, कारण त्यांचा अभ्यासच नाही. मराठ्यांना आरक्षण देणे त्यांच्या मनातच नाही. फक्त फिरवत बसवायचे, लटकवत ठेवायचे. हेच सरकार करत आहे. फडणवीसांनी जशी बाजू मांडली होती, तशी बाजू मांडली असती तर आज हा विषयच आला नसता, असेही त्यांनी सांगितले.
तेव्हाचे महाधिवक्ता कुंभकोणी हे सुनावणीलाच जात नव्हते, ते का जात नव्हते. अशा अनेक त्रुटी, बोगसपणा सरकारने केल्यामुळे आज मुडदे पडूनही मराठ्यांना आरक्षण मिळालेले नाही. हात पसरून झाले, आंदोलने करून झाली. आता मराठे तीव्र आंदोलन कधी करतील, याची वाट ठाकरे सरकार पाहत आहे. पण तो दिवसही दूर नाही. मराठे घरात घुसून तुमच्याकडून हक्काचे घेतील, हे सरकारने आणि त्यांच्या मंत्र्यांनी लक्षात ठेवावे. अनेक नेते आता आपापल्या परीने आंदोलनाचा इशारा देत आहेत. भाजपा मराठ्यांना एकत्र करून तीव्र आंदोलन उभे करत आहे. त्याची पुढची रूपरेषा लवकरच कळेल, असेही निलेश राणे म्हणाले.
उद्धव ठाकरे आणि अजित पवार यांना यात रस आहे, असे वाटत नाही, या सर्व कारणांमुळेच मराठा आरक्षणाचा विषय अडकला आहे. हातात कागद न घेता मुख्यमंत्री ठाकरे यांना यातील एक मुद्दा देखील सांगता येणार नसल्याची टीकाही यावेळी निलेश राणे यांनी केली. मुख्यमंत्री ठाकरे दिल्लीला जाणार आहेत, यावर बोलताना त्यांची आरती ओवाळायची का ? म्हणत ते घरातून बाहेर निघाले तेच खूप आहेत. असा टोलाही राणे यांनी लगावला.