औरंगाबाद (वृत्तसंस्था) बंडातात्यांच्या अटकेनंतर भाजप आध्यात्मिक आघाडीचे अध्यक्ष आचार्य तुषार भोसले यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. मुघलांपेक्षा ठाकरे सरकार अत्याचारी आहे, असं म्हणत तुषार भोसले यांनी ठाकरे सरकारवर सडकून टीका केली आहे. बंडातात्यांच्या अटकेनंतर शिवसेनेला आता भगवा झेंडा हातात घेण्याचा अधिकार नाही, असं म्हणत आचार्य तुषार भोसले यांनी शिवसेनेला देखील लक्ष्य केलं.
औरंगजेबापेक्षाही राज्यातलं सरकार अत्याचारी आहे. मुघलांनी सुद्धा वारकऱ्यांचे इतके हाल केले नव्हते. भागवत धर्माची भगवी पताका घेऊन जाणाऱ्या बंडातात्या आणि वारकऱ्यांना अटक करणाऱ्या सरकारला लाज कशी वाटत नाही? तुमचं डोकं ठिकाणावर आहे का?, असा सवाल तुषार भोसले यांनी विचारला. तुषार भोसले यांनी शिवसेनेसा देखील लक्ष्य केलं. बंडातात्यांच्या अटकेनंतर शिवसेनेला आता भगवा झेंडा हातात घेण्याचा अधिकार नाही, असं ते म्हणाले. तर सरकारला इशारा देताना उद्धवजी आणि अजित पवार आता परिणाम भोगायला तयार रहा, असं ते म्हणाले.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा राज्य सरकारने आषाढी वारी सोहळ्यावर निर्बंध घातले आहेत. केवळ मानाच्या पालख्यांना पंढरपूरमध्ये प्रवेश देण्यात येणार आहे. वाखरीपासून दीड किलोमीटर अंतरापर्यंत प्रतिकात्मक पायी वारी काढली जाणार आहे. मात्र सामान्य वारकऱ्यांना मात्र पायी वारीस मनाई करण्यात आली आहे.
दरम्यान, शासनाचा आदेश झुगारुन पंढरपूरच्या दिशेने पायी निघालेल्या बंडातात्या कराडकर यांना पिंपरी-चिंचवड पोलिसांनी अखेर ताब्यात घेतलं आहे. त्यांना दिघीजवळील संकल्प गार्डन मंगल कार्यालयात ठेवण्यात आले आहे.
कोण आहेत तुषार भोसले?
तुषार भोसले हे भाजपच्या आध्यात्मिक आघाडीचे प्रमुख आहेत. आध्यात्मिक क्षेत्रातील ते आचार्य आहेत. त्यांना देण्यात आलेल्या आचार्य पदवीबाबतही वाद झाला होता. तसेच तुषार भोसले यांचं खरं नाव तुषार शालीग्राम पितांबर असल्याची सोशल मीडियावर जोरदार चर्चा आहे. ते बहुजन समाजाचे नसून ब्राह्मण असल्याच्या चर्चाही मधल्या काळात रंगल्या होत्या. त्यांनी वेदांत वाचस्पती जगन्नाथ महाराज यांच्याकडे वेदांचे शिक्षण घेतले आहे. ते जगन्नाथ महाराजांचे पट्टशिष्य म्हणून ओळखले जातात. त्यांनी पुढील शिक्षण मुंबईतील भारतीय विद्याभवनमधून घेतले आहे. वयाच्या १७ व्या वर्षी अखंड ३६५ दिवस प्रवचन देण्याचा विक्रम त्यांच्या नावावर आहे.