मुंबई (वृत्तसंस्था) कोरोनाबाधितांच्या वाढत्या संख्येच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात १५ एप्रिलपासून पुन्हा कडक लॉकडाउन लागू करण्यात आला. सुरुवातीला केवळ १५ दिवसांसाठी म्हणून घोषित करण्यात आलेला हा लॉकडाउन आता एक जूनपर्यंत लागू करण्यात आला आहे. त्यामुळे एक जूननंतर लॉकडाउन पुढे वाढवला जाणार की नाही, याबद्दल लोकांच्या मनात संभ्रम आहे. दरम्यान, सूत्रांच्या माहितीनुसार एक जूनपासून टप्प्याटप्प्याने ‘अनलॉक’ची प्रक्रिया सुरू केली जाणार आहे.
आपण तयारीचा आढावा घेणार आहोत. जर सर्व गोष्टी सकारात्मक असतील तरच मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री टास्क फोर्समधील तज्ज्ञांशी चर्चा करत निर्बंध काही प्रमाणात शिथील करण्याचा विचार करु शकतात. निर्बंध पूर्णपणे उठवले जातील या भ्रमात राहू नका,” असं राजेश टोपे यांनी सांगितलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सरकारकडून लॉकडाउन उठवण्याची तयारी सुरु झाली असून ३० जूनपर्यंत सर्व गोष्टी पार पडतील. निर्बंध शिथील करण्यास नेमकी कधीपासून सुरुवात होईल याबाबत अद्याप स्पष्टता नाही. तिसऱ्या लाटेची भीती असल्याने निर्बंध पूर्णपणे उठवले जाणार नाहीत, मात्र काही प्रमाणात शिथीलता दिली जाऊ शकते.
चार टप्प्यांमध्ये उठवला जाणार लॉकडाउन
पहिला टप्पा – दुकानांना सकाळी ७ ते दुपारी २ वाजेपर्यंत सुरु ठेवण्यास परवानगी दिली जाईल.
दुसरा टप्पा – दैनंदिन गरजांशी संबंधित अन्य काही दुकानांना सुरु ठेवण्याची परवानगी दिली जाऊ शकते. पर्यायी दिवसांवर ही दुकाने उघडण्यास परवानगी दिली जाईल,.
तिसरा टप्पा – हॉटेल्स, परमिट रुम, बिअर बार, दारुच्या दुकानांना निर्बंधासह सुरु ठेवण्यास परवानगी असेल. हॉटेल्सना ५० टक्के क्षमतेसह सुरु ठेवण्याची परवानगी दिली जाईल.
चौथा टप्पा – मुंबई लोकल, धार्मिक स्थळं, जिल्हाबंदी पुढे ढकलली जाऊ शकते.