मुंबई (वृत्तसंस्था) राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा कार्यक्रम पुढील दोन आठवड्यांत जाहीर करण्याचे आदेश न्यायालयाने राज्य निवडणूक आयोगाला (Election Commission) दिले आहेत. यावर आता राज्याचे इतर मागासवर्गीय कल्याण मंत्री विजय वडेट्टीवार (vijay Vadettiwar) यांनी प्रतिक्रिया दिली असून हा निकाल केवळ ५ महापालिकांसाठी असून इतर सर्व निवडणुका पावसाळ्यानंतरच होणार असल्याचे स्पष्ट केले आहे.
इतर ठिकाणचे इच्छुक टांगणीला
त्यामुळे आता मे-जूनमध्ये राज्यात कोल्हापूर, औरंगाबाद, वसई-विरार, नवी मुंबई आणि कल्याण-डोंबिवली या महापालिकांच्या निवडणुका पार पडणार आहेत. तर अन्य ठिकाणच्या इच्छुकांचा जीव पुन्हा टांगणीला लागला आहे.
प्रभाग पुर्नरचनेचे जे अधिकार आयोगाकडे जातील
याबाबत बोलताना विजय वडेट्टीवार म्हणाले, आज सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक प्रक्रिया दोन आठवड्याच्या आत सुरू करावी असे म्हटले आहे. मात्र केवळ ५ महापालिकांसाठी प्रक्रिया सुरू करण्याचे निर्देश आहेत. त्यामुळे प्रभाग पुर्नरचनेचे जे अधिकार राज्य सरकारकडे घेतले होते आता ते आयोगाकडे जातील. उद्या मुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत बैठक होईल आणि त्यानंतर प्रक्रिया सुरू होईल. या बैठकीला आम्ही दिल्लीतील वकिलांना बोलावून घेतले आहे. निकालात नेमकं काय म्हटले यावर उद्या चर्चा होईल.
५ महापालिकांच्या निवडणुका आता पार पडतील
स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका पावसाळ्यात होत नाहीत, त्यामुळे या ५ महापालिकांच्या निवडणुका आता पार पडतील आणि अन्य निवडणुका पावसाळ्यानंतर होतील. याशिवाय हा निर्णय आपल्यासाठी धक्कादायक असून आपल्याला त्याची अपेक्षा नव्हता अशीही प्रतिक्रिया वडेट्टीवार यांनी माध्यमांशी बोलताना दिली. सरकारने स्वतःकडे घेतलेला निर्णय लागू झाला असता तर इतर राज्यांना देखील लागू झाला असता, असेही मत त्यांनी व्यक्त केले. मंत्री वडेट्टीवार यांनी यावेळी महाविकास आघाडी म्हणून आम्ही लोकांच्या बाजूने आहोत असा विश्वासही दिला.