जळगाव (प्रतिनिधी) राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर मंगळवारी देशवासियांना संबोधून केलेल्या भाषणावरून टीका करणारे ट्वीट भाजपाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी रीट्वीट केले होते. परंतू अवघ्या तासाभरात ते ट्वीट खडसे यांनी डिलीट केल्यामुळे त्यांच्या पक्षांतराच्या निर्णयाबाबत संभ्रम निर्माण झाला आहे.
नरेंद्र मोदींनी मंगळवारी देशवासियांना संबोधून भाषण केलं. त्यांच्या या भाषणावर टीका करणारं ट्विट जयंत पाटील यांनी केलं होतं. त्यांनी म्हटलं होतं की, “आजच्या भाषणात पंतप्रधान काहीतरी नवीन सांगतील, करोना व आर्थिक संकटावर मात करण्यासाठी मार्ग देतील, अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना दिलासा देतील असं वाटलं होतं. मात्र यापैकी त्यांनी काहीच केले नाही. महाराष्ट्राचा, देशाचा भ्रमनिरास केला. हेच ट्वीट खडसे यांनी रीट्वीट केले होते. परंतू एकनाथराव खडसे यांनी तासाभरातच माघार घेतल्याने आता पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे.