नवी दिल्ली (वृत्तसंस्था) आम आदमी पक्ष हा भारतीय जनता पक्षाचेच प्रतिरुप आहे. त्यामुळेच हा पक्ष यात्रा-जत्रा काढत आहे, अशी टीका माजी अर्थमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी. चिदंबरम यांनी केली आहे.
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी राजधानी दिल्ली ते उत्तर प्रदेशातील अयोध्येपर्यंतच्या मुख्यमंत्री तीर्थ यात्रा कार्यक्रमाच्या पहिल्या ट्रेनला हिरवा झेंडा नुकताच दाखवला आहे. या पार्श्वभूमीवर कॉग्रेसचे ज्येष्ठ नेते पी. चिदंबरम यांनी केजरीवाल यांच्यावर हल्लाबोल केला आहे. चिदंबरम माध्यमांशी बोलत होते. पी.चिदंबरम म्हणाले, ”आम आदमी पक्ष हा भारतीय जनता पक्षाचेच प्रतिरुप आहे. त्यामुळेच हा पक्ष यात्रा-जत्रा काढत आहे, अनुकरण हा लांगुलचालन करण्याचा सर्वोत्तम मार्ग आहे. आप जितकं जास्त भाजपाचं अनुकरण करेल, तितका तो पक्ष अधिकाधिक संदर्भहीन होत जाईल. लवकरच आप हे भाजपाचंच प्रतिरुप होऊन जाईल,” ”आप आदमी पक्ष हा भाजपचा क्लोन आहे,” असे चिदंबरम म्हणाले.