मुंबई (वृत्तसंस्था) माझ्याकडूनही चूक झाली होती तेव्हा मी एक दिवस आत्मक्लेश केला होता. मला माझंच वागणं मनाला लागलं होतं. आता जर वय जास्त झालं ८२ झालं, ८३ झालं तर तुम्ही कधी थांबणार आहात की नाही?. मी सुप्रियाला सांगितलं की तू साहेबांशी बोल, समजावून सांग… पण नाही, त्यांना थांबायचंच नाही, अशा शब्दात अजित पवार यांनी पहिल्यांदा थेट शरद पवारांवर टीका केली.
राष्ट्रवादीतून बंड केल्यानंतर अजित पवार यांच्या गटाची आज पहिलीच जाहीर सभा झाली. यावेळी बोलताना अजित पवार यांनी शरद पवार यांच्या राजकीय कारकीर्दीची एकप्रकारे चिरफाडच केली. मी महाराष्टाला कधी खोटं बोलणार नाही, खोटे बोलेल तर मी पवारांची औलाद असल्याचे सांगणार नाही म्हणत भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांसोबत राष्ट्रवादीच्या ज्येष्ठ नेत्यांनी चर्चा केली. पण मला सांगण्यात आले कुणाला काही सांगायचे नाही असे सांगून मला शांत केले.
मी सुप्रियाशीही बोललो, सुप्रिया आपण एका घरातले, एका कुटुंबातले आहोत काहीतरी सांग. त्यावर सुप्रिया म्हणाली ते हट्टी आहेत. हा नेमका कसला हट्ट आहे? शरद पवारांविषयी आम्हाला खूप आदर आहे. आत्ता सांगितलं की काही काही आमदारांना बोलवलं जातं. ते भेटले नाही तर त्यांच्या पत्नींना फोन केला जातो भावनिक केलं जातं. मी नाव घेत नाही वरिष्ठ नेत्याने एका आमदाराला सांगितलं की का तिकडे जातो. त्याने हात जोडून सांगितलं आम्ही दादांना शब्द दिला आहे.
2014 साली वानखेडे स्टेडिअमवर देवेंद्र फडणवीसांच्या शपथविधीला आम्हाला जायला सांगितले होते. त्यांच्यासोबत जायचे नव्हते तर का तिथे आम्हाला पाठवले होते. 2017 मध्येदेखील असाच प्रयत्न झाला होता. वर्षा बंगल्यावर बैठक झाली होती. राष्ट्रवादीकडून अजित पवार, जयंत पाटील, सुनिल तटकरे आणि छगन भुजबळ उपस्थित होते. भाजपकडून सुधीर मुनगंटीवार, देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील, चंद्रशेखर बावनकुळे उपस्थित होते. तेव्हा भाजप म्हणाले, आम्ही 25 वर्षं शिवसेनेसोबत होतो आणि आम्ही त्यांची साथ सोडणार नाही. त्यांनंतरही देवेंद्र फडणवीस आणि माझ्यात पाच बैठका झाल्या. मात्र आम्हाला सांगण्यात आले की बाहेर काहीच बोलायचे नाही, असे अजित पवार म्हणाले.
महाविकास आघाडीच्या काळातही भाजपसोबत सत्तेत सहभागी व्हावं, असं पत्र राष्ट्रवादीच्या आमदारांनी दिलं होतं, असा गौप्यस्फोट प्रफुल्ल पटेलांनी केला होता. त्यावर बोलताना अजित पवारांनी सांगितलं की, मी उपमुख्यमंत्री असताना, माझ्याच केबीनमध्ये राष्ट्रवादीच्या सर्व आमदारांनी एक पत्र ड्राफ्ट केलं. हसन मुश्रीफ साहेबांनी 53 विधानसभेचे आमदार आणि इतर परिषदेच्या आमदारांनी त्यावर सह्या केल्या होत्या. तेव्हा आपापली कामं व्हायची असतील तर सत्तेत सहभागी व्हावं, अशी विनंती सर्व आमदारांनी केली होती.