भोपाळ (वृत्तसंस्था) गुंगीचं औषध देऊन २६ वर्षीय नर्सिंगच्या विद्यार्थिनीवर मित्राकडूनच बलात्कार करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. बलात्कारादरम्यान आरोपीने व्हिडीओ शूट केला असून त्याच्या आधारे आपल्याला ब्लॅकमेल केलं जात असल्याचा आरोप पीडित तरुणीने केला आहे. मध्य प्रदेशातील भोपाळमधील निशातपुरा येथे ही घटना घडली आहे.
गोविंद अहिरवार असं गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचं नाव आहे. आरोपी अहिरवार आणि २६ वर्षीय पीडित तरुणी एका महाविद्यालयात शिक्षण घेतात. आरोपी अहिरवार यानं १४ ऑगस्ट रोजी पीडितेला कॉलेजला सोडण्याचा बहाणा केला. कॉलेजचाच ओळखीचा मित्र असल्यानं पीडित तरुणीही त्याच्या गाडीत बसली. दरम्यान, यानंतर त्याने रस्त्यात काही खायला घेतलं आणि त्यात गुंगीचं औषध मिसळलं. अन्न खाल्ल्यानंतर बेशुद्ध अवस्थेत पीडितेला आऱोपीच्या भाड्याच्या घरी नेण्यात आलं. याठिकाणी आरोपीनं तिच्यावर बलात्कार केला. नराधम आरोपी एवढ्यावरच थांबला नाही, तर या गंभीर घटनेचा अश्लील व्हिडीओदेखील शूट केला. यानंतर आरोपीनं संबंधित व्हिडीओच्या आधारे पीडित तरुणीला ब्लॅकमेल करू लागला. आरोपीच्या त्रासाला कंटाळून पीडित तरुणी आपल्या आई वडिलांकडे अलीराजपूर येथे गेली आणि तिच्यासोबत घडलेला सर्व प्रकार तिने आपल्या पालकांना सांगितला. आरोपीनं जीवे मारण्याची आणि संबंधित व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल करण्याची देखील धमकी दिली आहे.
घटनेची माहिती मिळताच पीडितेच्या पालकांनी अलीराजपूर पोलीस ठाण्यात आरोपी विरोधात गुन्हा दाखल केला. पण संबंधित घटना भोपाळ येथील निशातपुरा याठिकाणी घडल्यानं हे प्रकरण निशातपुरा पोलिसांकडे वर्ग करण्यात आलं. याप्रकरणी पोलीस आरोपीचा शोध घेत असून घटनेचा तपास सुरू आहे.