अहमदनगर (वृत्तसंस्था) “शिवाजी पार्क येथे शपथ घेऊन आम्हाला एक वर्षे पूर्ण झालं. हे एक वर्ष कसं गेलं हे भाजपला कळलं नाही. तर उरलेली चार वर्षदेखील कशी जातील हे त्यांना कळणार नाही”, असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी लगावला.
महाविकास आघाडीची सत्ता स्थापन होऊन आता एक वर्ष पूर्ण झालं आहे. मात्र, भाजपकडून वारंवार हे सरकार जास्त काळ टीकणार नाही, अंतर्गत मतभेदांमुळे हे सरकार पडेल, अशी टीका केली जात आहे. याबाबत जयंत पाटील यांना प्रश्न विचारला असता त्यांनी भाजपवर निशाणा साधला. “भारतीय जनता पक्षाचे नेते कोरोनाच्या संकट काळात अत्यंत बेजबाबदारपणे वागले. त्यांचा बेजबाबदारपणा प्रत्येक गोष्टीत दिसून आला. कोरोना हे मोठं संकट आहे. मात्र, तरीही हा विषय बाजूला ठेवून त्यांनी आपल्या पक्षाची पोळी भाजून घेण्याचा प्रयत्न केला”, असा घणाघात जयंत पाटील यांनी केला. “मंदिरं बंद होती तर त्यांनी मंदिराबाहेर आंदोलन केली. खरंतर कोरोनाचा प्रसार होऊ नये यासाठी मंदिरं बंद होती. मात्र, जाणीवपूर्वक आंदोलन करायची आणि आम्ही कसे भक्त आहोत ते दाखवायचं”, असा चिमटा पाटील यांनी काढला. “राज्य सरकारने विचारपूर्वक सर्व गोष्टी सुरु केल्या. आता दिवाळी पाडव्याच्या मुहूर्तावर मंदिर सुरु केली. त्यामुळे भाजपने आकाळतांडव करुन राजकारण करण्याची आवश्यकता नाही”, असा खोचक सल्ला जयंत पाटील यांनी दिला.