जळगाव (प्रतिनिधी) भोसरी भूखंड खरेदी प्रकरणात झालेल्या आरोपांवरून भाजपने तत्परता दाखवत माझ्या मंत्रिपदाचा राजीनामा घेतला. नागपूर भूखंड प्रकरण तुमच्या मुख्यमंत्र्यांनी केले असे तुम्हीच म्हणता. असे असताना त्यांच्या राजीनाम्याची मागणी करायची नाही, ही भाजपची दुटप्पी भूमिका आहे. असा आरोप राष्ट्रवादीचे नेते आमदार एकनाथराव खडसे यांनी केला आहे. खडसे शनिवारी जळगावात पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तरे देत होते.
खडसे नेमकं काय म्हणालेत !
नागपूरच्या सुधार प्रन्यास मंडळाच्या भूखंडाचे प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याने मंत्र्यांनी निर्णय द्यायचा नसतो. ही बाब न्यायप्रविष्ट असताना तत्कालीन नगरविकास मंत्री शिंदे यांनी निर्णय दिला. ही अनियमितता, भ्रष्टाचारच आहे. विरोधी पक्षाने मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. भूखंडाचे आरोप माझ्यावरही झाले. त्याचा दुरान्वये संबंध नव्हता. नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा देण्यास सांगण्यात आले. त्यानुसार राजीनामा दिला. आता भाजपच्या प्रदेशाध्यक्षांनीच आरोप केलेला असल्याने मुख्यमंत्र्यांनी राजीनामा दिला पाहिजे असे खडसे म्हणाले.
शिंदेंच्या राजीनाम्याबाबत भाजपची दुटप्पी भूमिका !
मुख्यमंत्र्यांनी चौकशीतून बाहेर येईपर्यंत राजीनामा द्यावा. चौकशीतून निर्दोष झाल्यास पुन्हा मुख्यमंत्री व्हावे. एखाद्यावर आरोप होत असताना राजीनामा द्यायला लावायचा आणि स्वतःवर आरोप होतात तेव्हा दुर्लक्ष करायचे ही भूमिका बरोबर नाही. चंद्रशेखर बावनकुळे यांनी सरकार नसताना हा तारांकित प्रश्न उपस्थित केला होता. आता त्यांच्या सत्ताधारी पक्षानेच आक्षेप घेतल्याने चौकशीला पुष्टी मिळते असेही खडसे म्हणाले.